नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमणांचा बांध

शिक्रापुरात धनदांडग्यांकडून ओढे गिळकृंत : चक्‍क आडव्या भिंती उभारल्या

शिक्रापूर- शासन पाणी अडवा पाणी जिरवा, ओढे, नाले खोलीकरण करण्यासाठी लाखो रुपये निधी खर्च करून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त पाणी साचवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी ओढे, नाल्यामधील नैसर्गिक स्त्रोत बुजविले असताना खुले करून देण्यासाठी आंदोलने होत असताना शिक्रापूरात ओढ्यांवर अतिक्रमण करून मोठ, मोठ्या भिंती उभारल्या जात आहे. धनदांडग्यांकडून ओढ्यावर अतिक्रमणांचा बांध घातला आहे. सध्या ओढे, नाले गिळकृंत होत असताना संबंधित यंत्रणा कारवाईचा बागुलबुवा करीत आहे.

शिक्रापूर येथील पुणे- नगर रस्त्याच्या कडेला बजरंगवाडी येथे जुन्या काळापासून नैसर्गिक ओढा आहे. ओढ्याच्या कडेला काही अंतरावर काही महिन्यांपूर्वी स्थानिकांनी अतिक्रमण करून जमीन तयार केली होती. आता ओढ्याच्या नैसर्गिक स्त्रोतामध्ये स्थानिकांनी मोठ्या आकाराचे पाइप टाकून नैसर्गिक स्त्रोत कमी करून ओढ्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत कमी झाला असल्याचे दिसून येत आहे.

सध्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे स्थानिक ओढे, नाले, नदीचे लचके तोडून अतिक्रमण करून जमिनीचे क्षेत्र वाढविले जात आहेत. एकीकडे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कमी केल्यामुळे नागरी वस्तीत पाणी घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद केल्यामुळे नागरिकांना उपोषण करण्याची वेळ आली आहे. शासन “पाणी आडवा, पाणी जिरवा’ तसेच ओढे, नाले खोलीकरणासाठी लाखो रुपये निधी खर्च करताना दुसरीकडे ओढे नाले बुजविले जात आहेत.

शिक्रापूर येथील ओढ्यावर अतिक्रमण करून लहान लहान पाइप टाकून ओढा बुजविला असताना याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. या घटनेचा पंचनामा केला होता. मात्र, आता या ठिकाणचे नागरिक ओढा बुजवून थांबलेले नाहीत. आता ओढ्यांवर तलाठी यांचा पंचनामा झालेला असताना ओढ्यांवर सिमेंटच्या भिंती उभारल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक ओढा राहणार की अतिक्रमणाद्वारे नष्ट होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुन्हा पाहणी करून कारवाई करू – तहसीलदार लैला शेख
शिक्रापूर येथील ओढ्यावरील अतिक्रमणाबाबत तहसीलदार लैला शेख म्हणाल्या की, पूर्वीच्या तक्रारीनुसार तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे. हा पंचनामा तपासून पुन्हा पंचनामा करण्याचे तातडीचे आदेश मंडलाधिकारी तसेच तलाठी यांना देणार आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.