ऐन पावसाळ्यात नदीत बांध; पुणे महापालिकेचा प्रताप

नदी अडवून कामाची घाई

– सुनील राऊत

पुणे – ऐन पावसाळ्यात महापालिका प्रशासनाकडून मुठा नदीत चक्‍क बांध घालण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नदीपात्रातील माती काढूनच तेथे बांध उभारण्यात आला आहे. तर, नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू असावा, यासाठी चार पाइप टाकण्यात आले आहेत. राजाराम पुलाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या आर्ट प्लाझाच्या कामासाठी हा “घाट’ घालण्यात आला आहे.

येरवडा येथील बंडगार्डन पुलाच्या धर्तीवर हा आर्ट प्लाझा उभारण्यात येणार आहे. यासाठी अंदाजपत्रकातही स्वतंत्र तरतूद आहे. हे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला खांब उभारले जाणार आहेत. हे काम संबंधित ठेकेदाराला कर्वेनगरच्या बाजूने सुरू करायचे आहे. मात्र, त्या बाजूने नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच जायचे झाल्यास एखाद्या मंगल कार्यालयाच्या खासगी जागेतून जावे लागणार आहे. त्यावर पर्याय म्हणून संबंधित ठेकेदाराने थेट नदीतच मातीचा बांध घातला आहे. त्यासाठी शेकडो टन राडारोडा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नदीत टाकला जात आहेत. विशेष म्हणजे, ही लागणारी माती सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामागील नदीपात्रातून खोदून या बांधासाठी टाकली जात आहे.

तर, नदीचे पाणी जाण्यासाठी चार पाइप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरही हे काम करणे शक्‍य असताना ऐन पावसाळ्यात या कामाची घाई का? असा प्रश्‍न आहे.

मेट्रोला उपदेशाचे डोस आणि…
महापालिकेच्या सर्व विभागांची पावसाळ्यापूर्व कामांची आढावा बैठक आयुक्‍त सौरभ राव यांनी दोन आठवड्यांपूर्वीच घेतली. यावेळी नदीपात्रात महामेट्रोचे सुरू असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच संगमवाडी येथे मेट्रोने नदीत टाकलेला राडारोडाही उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे एका बाजूला मेट्रोला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या प्रशासनाकडून मात्र तातडीची गरज नसलेल्या कामासाठी नदीतच रातोरात बांध घातला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पावसाळयातील सुरक्षेऐवजी आर्ट प्लाझाचे काम महत्त्वाचे वाटत असल्याचे चित्र आहे.

पुराचा धोका; तरीही कामाला परवानगी
पुढील काही दिवसांत शहर तसेच परिसरात पावसाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. या कालावधीत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येते. मात्र, आता या बांधामुळे पाणी अडण्याची शक्‍यता आहे. तसेच एकदा बांध घालून काम सुरू केले आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली, तर बांधासाठी टाकलेली माती काढणेही शक्‍य नाही. त्यामुळे धरणे भरल्यानंतर नदीत पाणी सोडल्यास या विठ्ठलवाडी तसेच नदीपात्रालगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याची भीती आहे. दरवर्षी धरणातून पाणी सोडल्यानंतर विठ्ठलवाडीच्‌ परिसरात पुराचा धोका असतो, हे माहिती असतानाही पालिकेने या कामाला परवानगी दिलीच कशी? अशा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

राजाराम पुलाच्या परिसरात आर्ट प्लाझा केला जाणार आहे. त्यासाठी पुलाच्या कर्वेनगरच्या बाजूस एक खांब नदीपात्रात उभारला जाणार आहे. ज्या बाजूला हा खांब उभारला जाणार आहे, तिकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने हा बांध घालण्यात आला आहे. त्याचे काम नंतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे बांध घातला असेल, तर तो तातडीनं काढण्याच्या सूचना देण्यात येतील.
– श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभाग प्रमुख, मनपा.

Leave A Reply

Your email address will not be published.