नगर – महापालिकेच्या ‘प्रभाग 6 अ’च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भारतीय जनता पार्टी कडून वर्षा रोहन सानप व पल्लवी दत्तात्रय जाधव असे दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या सारिका भूतकर यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता समितीने अवैध ठरवून रद्द केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या प्रभाग 6 मधील ‘अ’ या राखीव जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 6 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होत आहे.
भारतीय जनता पार्टी कडून वर्षा रोहन सानप यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. मात्र, मतदार यादीतील नावासंदर्भात सानप यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जाबाबत कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून पल्लवी दत्तात्रय जाधव यांचे नाव एबी फॉर्म वर देण्यात आले आहे. दोघांपैकी भाजपचा उमेदवार कोण हे छाननीवेळीच स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीत अर्ज भरण्याची मंगळवारी (दि.21) शेवटची मुदत आहे. शिवसेना व भाजप तसेच राष्ट्रवादी-कॉंग्रेस या प्रमुख पक्षांचे कोणते उमेदवार रिंगणात येतात, याची उत्सुकता आहे. सुरुवातीच्या 7-8 दिवसांत कोणीही अर्ज दाखल केले नव्हते. राखीव असलेल्या या जागेवर उमेदवारी करू शकणाऱ्या सक्षम उमेदवाराचा शोध राजकीय पक्षांचा सुरू आहे. महापौर बाबासाहेब वाकळेंचा हा प्रभाग असल्याने येथून भाजपचा उमेदवार विजयी करण्यात त्यांनी कसब पणाला लावले आहे. त्यामुळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी पाच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.