चारशे मीटर्स अडथळा शर्यतीत दलिलाहचा विश्‍वविक्रम

डेस मोनिस (अमेरिका) – ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या दलिलाह मोहम्मदने 400 मीटर्स अडथळा शर्यतीत विश्‍वविक्रम केला आणि अमेरिकन मैदानी स्पर्धेत शानदार कामगिरी केली.

दलिलाह या 29 वर्षीय खेळाडूने हे अंतर 52.20 सेकंदात पार केले आणि 2003 मध्ये रशियाच्या युलिया पेन्चोकोवाने नोंदविलेला 52.34 सेकंद हा विश्‍वविक्रम मोडला. 2016 मध्ये दलिलाहने रिओ येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. येथे तिने पहिल्या 300 मीटर्समध्ये जोरदार धाव घेतली.

तिच्यापुढे सिडनी मॅकलॉघेनचे आव्हान होते. शेवटच्या 100 मीटर्सच्या टप्प्यात तिने सातत्याचा वेग ठेवीत सोनेरी कामगिरी केली. मॅकलॉघेनने ही शर्यत 52.88 सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले. ऍश्‍ले स्पेन्सरला ब्रॉंझपदक मिळाने. तिला हे अंतर पार करण्यास 53.11 सेकंद वेळ लागला.

महिलांच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत डेझीरेस ब्रायंटने विजेतेपद मिळविले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास 22.47 सेकंद वेळ लागला. ब्रिटनी ब्राऊन व अँजी ऍनालुस यांना अनुक्रमे रौप्यपदक ब ब्रॉंझपदक मिळाले. 3 हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यत विश्‍वविजेती खेळाडू एम्मा कोबुर्नने जिंकली. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास 9 मिनिटे 25.63 सेकंद वेळ लागला. तिने 2016 च्या ऑलिंपिक स्पर्धेत ब्रॉंझपदक घेतले होते.

पुरूषांच्या 110 मीटर्स अडथळा शर्यत जिंकण्याचा मान डॅनियल रॉबर्टस याला मिळाला. त्याने ग्रॅंट होलोवे याच्यावर सनसनाटी विजय मिळविताना ही शर्यत 13.23 सेकंदात पार केली. होलोवे याला हे अंतर पार करण्यास 13.36 सेकंद वेळ लागला. ही शर्यत 13.38 सेकंदात पार करणाऱ्या डेव्हेन ऍलियनला ब्रॉंझपदक मिळाले.

1500 मीटर्स अंतराची शर्यत क्रेग एंजल्सने जिंकली. त्याने हे अंतर 3 मिनिटे 44.93 सेकंदात पूर्ण करताना 2016 चा ऑलिंपिक विजेता मॅथ्यु सेंट्रोविझ याच्यावर मात केली. सेंट्रोविझला रौप्यपदक मिळाले. जोश थॉम्पसनला ब्रॉंझपदक मिळाले. 200 मीटर्स शर्यतीत उदयोन्मुख खेळाडू नोहा लीस विजेता ठरला. त्याने ही शर्यत 19.78 सेकंदात पूर्ण केली. 100 मीटर्स शर्यतीचा विजेता खेळाडू ख्रिस्तियन कोलमनला रौप्यपदक मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.