नवी दिल्ली – भारताचा प्रसिद्ध मोटारसायकल रायडर सीएस संतोष याला सौदी अरेबियात सुरू असलेल्या डकार रॅली दरम्यान भीषण अपघात झाला असून, वैद्यकीयदृष्ट्या तो कोमात गेला आहे.
भारताचा 37 वर्षीय रायडर संतोष हा जगातील सर्वांत मोठ्या अशा हिरो मोटोस्पोर्टस संघाकडून डकार रॅलीत सहभागी झाला असून, या रॅलीच्या चौथ्या टप्प्यात त्याला अपघात झाला.
अपघातानंतर त्याला विमानाने रियाध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी डॉक्टरांनी तो कोमात असल्याचे सांगितले. त्याला चोविस तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. संतोषला ट्रॅकवरून बाहेर आणण्यात आले, तेव्हा तो शुद्धित होता. त्यानंतर त्याला तातडीने रियाधला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तो कोमात असल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या शर्यतीत 135 कि.मी. झाल्यानंतर संतोषला अपघात झाला. संतोष या स्पर्धेत सातव्यांदा सहभागी झाला होता. ही रॅली पूर्ण करणारा संतोष पहिला भारतीय रायडर ठरला होता. त्याने सर्वप्रथम 2015 मध्ये ही कामगिरी केली आणि त्यानंतर दोनवेळा त्याने अशीच कामगिरी केली. संतोषला यापूर्वी 2013 मध्ये अबु धाबी डेझर्ट चॅलेंज स्पर्धे दरम्यान देखिल अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.
डकार रॅली म्हणजे काय
ही रॅली एकूण 12 टप्प्यात पार पडते. स्पर्धेत एकूण 7646 किलोमीटरचे अंतर कापले जाते. यातील चौथा टप्पा हा सर्वात खडतर आणि एकूण 813 किलोमीटरचा असतो. स्पर्धेला सुरवात झाल्यापासून म्हणजे 1979 पासून 2007 पर्यंत ही स्पर्धा युरोपमधील विविध देशात पार पडली. गेल्यावर्षीपासून ही स्पर्धा सौदी अरेबियात होत आहे.