“त्या’ हिरे लुटारूंच्या मुसक्‍या आवळल्या

पुणे- रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याकडील 1 कोटी 48 लाख रुपयांचे हिरे व दागिने लुटणाऱ्या चोरट्यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुसक्‍या आवळल्या आहेत. याप्रकरणी रविवारी रात्री तिघांना ताब्यात घेण्यात आले. चोरलेला ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

रांका ज्वेलर्सच्या मुंबई येथील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर चाकूने वार करीत 1 कोटी 48 लाख 5 हजार रुपयांचे हिरे तसेच सोन्याचे दागिने ठेवलेली सॅक लुटारूंनी लंपास केली होती. पुणे रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी अजय मारुती होगाडे (20 , रा.सायन, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी अजय होगाडेला मुंबईतील व्यवहार पाहणारे सुभाषभाई बिष्णोई यांनी गुरूवारी दि. 26 जुलै रोजी दुपारी कॉल करून पुणे येथे दागिने, हिरे घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार मुंबईतील काव्या ज्वेलर्सकडून आलेले पार्सल तसेच पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या कर्वे रोड आणि रविवार पेठ येथील शाखेत पाठविण्यात येणारे हिरे आणि दागिन्यांचे एकूण चार पार्सल घेऊन ट्रेनने होगाडे पुणे स्टेशनला उतरले. शुक्रवारी पहाटे एक वाजता पुणे रेल्वे स्थानकवरील सहा नंबर प्लॅटफॉर्मचा जिना चढून ते बाहेर आले. यानंतर रिक्षाजवळ उभा राहून बिष्णोई यांना मोबाईलवर कॉल करत असताना तेथे आलेल्या चौघांनी त्यांना धक्काबुक्की केली. फिर्यादींनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या पोटावर तसेच पाठीवर चाकूने वार केले तसेच पाठीवरील दागिने आणि हिरे असलेली सॅक हिसकावून पळ काढला होता. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली होती. बंडगार्डन पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकही याचा समांतर तपास करत होते. तपासा दरम्यान खंडणीविरोधी पथकाने तिघांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व उपनिरीक्षक राहुल घुगे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)