पुणे: येणारा काळ हा महिलांचा आहे, गावातील समाजकार्यात महिलांचा वाढता सहभाग, अर्थात गावात ‘ती सरपंच’ होतीय याचा आनंद आहे, गावच्या विकासात, समाज कार्यात त्यांचा सहभाग वाढतोय हे कौतुकास्पद असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दैनिक प्रभात आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक अशा काही योजना आहेत, त्या गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन आपल्या गावात आणल्या पाहिजेत, यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाहूपुरी तालुक्यातील एका रुग्णालयाने 8 कोटी रुपये यांचे सी.एस. आर फंडातून मशीन कशी घेतली, आज कसा फायदा गावकऱ्यांना होतोय, हे उदाहरण देत सांगितले.
देशाचा कणा म्हणजे गाव आणि या गावांचे व्यवस्थापन पाहणारे असतात ते सरपंच… संपूर्ण गाव सांभाळणाऱ्या या सरपंचांच्या कार्याचा गौरव ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन करण्याचा विचार दैनिक ‘प्रभात’ने उचलून धरला आहे, आज जिल्ह्यातील 37 सरपंच यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
गाव आणि या गावांचे व्यवस्थापन पाहणारे सरपंच म्हणजे देशाचा कणा! संपूर्ण गाव सांभाळणाऱ्या या सरपंचांच्या कार्याचा दैनिक प्रभातच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव केला. आगामी काळ हा स्त्री शक्तीचा आहे. त्यामुळे, महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी काम करावे अशा शुभेच्छा दिल्या.… pic.twitter.com/Zek68WdTZk
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 12, 2024
“ज्यावेळी भारताचे लोक गरिबीवर मात करतील, देशाच्या प्रगतीसाठी अधिक कार्यक्षमतेने काम करतील आपली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बळकट होईल. हे केवळ स्वप्नच नाही तर आपल्या सर्वांसाठी उद्दिष्टच आहे,” असं अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं. आणि याची सुरुवात ही गावापासून होते, आणि आता गावचे प्रमुख म्हणून सरपंच या नात्याने ती जबाबदारी तुमच्याकडे आली आहे, गावचा सर्व समावेशक विकास करण्यासाठी तुम्ही आणखी जोमाने काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थितांना प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी प्रास्ताविक करतेवेळी केले.
यंदा हा सोहळा सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष होते.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराच्या आधी सरपंचांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा असणारी विशेष पुरवणीचे यावेळी अनावरण करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाला दैनिक’प्रभात’चे चेअरमन डॉ. हर्षद गांधी, कार्यकारी संपादक अविनाश भट हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘हिंदुस्तान फीड्स’ यांच्यासह दि कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेड, ‘अविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स’, ‘ऑक्सिकूल’ यांच्यासह आउटडोअर पार्टनर म्हणून ‘रीवेल’ यांचे प्रायोजकत्त्व मिळाले. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार दीक्षित तर समारोपचे सूत्रसंचालन श्रीनिवास वारंजीकर यांनी केले.