पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशाचा कणा म्हणजे गाव आणि या गावांचे व्यवस्थापन पाहणारे असतात ते सरपंच! संपूर्ण गाव सांभाळणाऱ्या या सरपंचांच्या कार्याचा गौरव “आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन करण्याचा विचार दैनिक “प्रभात’ने उचलून धरला. यंदा हा सोहळा सोमवार, दि. १२ अॉगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असलेल्या शुभारंभ लॉन्स येथे सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे नेतृत्त्व करणारे मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय असाच होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंचांचा गौरव केला जाणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्यासह चेअरमन डॉ. हर्षद गांधी, कार्यकारी संपादक अविनाश भट हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला “हिंदुस्तान फीड्स’ यांच्यासह दि काॅसमाॅस को-आॅप. बॅंक लिमिटेड, “अविष्कार कन्सल्टन्सी अॅंड डेव्हलपर्स’ , “आॅक्सिकूल’ यांच्यासह आउटडोअर पार्टनर म्हणून “रीवेल’ यांचे प्रायोजकत्त्व मिळाले आहे. या कार्यक्रमात “आदर्श सरपंच विशेष पुरवणी’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमास केवळ निमंत्रित व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.