दैनंदिन आरोग्य असे असावे

आंघोळ

नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. तर त्यासाठी सर्व अवयव चांगले घासून चोळून आंघोळ करावी. उघड्यावर आंघोळ व्यवस्थित होत नाही. आंघोळ केल्यावर खरबरीत पंचा/टॉवेलने अंग कोरडे करावे. अगदी मऊ फडक्‍याला अंग नीट पुसले जात नाही व कातडी कोरडी होत नाही.

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र टॉवेल वापरावा. एकच टॉवेल वापरल्यामुळे त्वचेचे आजार लवकर पसरतात. रोज स्वच्छ पाण्याने व साबणाने अंग चोळून आंघोळ करावी. शक्‍य असल्यास सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळेस आंघोळ
करावी.

केस

केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवड्यातून एकदा तरी केस धुवावेत. यासाठी शिकेकाई/ रिठा यांचा केस धुण्यासाठी वापर करावा. केस धुतल्यावर ते पुसून चांगले वाळवावेत. तसेच केस दररोज विंचरावेत. म्हणजे उवा होणार नाहीत. नाहीतर उवा, कोंडा, लिखा केसात होऊ शकतात. त्यातून उवा झाल्याच तर गोडेतेल व कपूर एकत्र करून केसांना लावावा.

कपडे घालताना स्वच्छ धुतलेले आणि उन्हात वाळवलेले कपडे घालावेत. तसेच ऋतुमानाप्रमाणे कपडे वापरलेले जास्त चांगले. केस धुतल्यावर कोरडे करावेत. केसांना रोज तेल लावावे. केस रोज विंचरावेत. मुलांनी केस नियमितपणे कापावे. मुलींनी लांब केसांच्या वेण्या घालाव्यात. कधीही कपडे धुतल्यावर नेहमी स्वच्छ जागेत व उन्हात वाळवावेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवल्यामुळे खरजेसारखे रोग होत नाहीत.

नखे

नियमितपणे नखे कापावीत. कारण नखात अडकलेली घाण पोटात जाऊन वेवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार होऊ शकतात. कोणत्याही टोकदार वस्तूने नखे खरडू नयेत. त्यामुळे नखांवरील संरक्षणात्मक पेशी (प्रोटेक्‍टिव सेल्स) निघू शकतात. नखे अजिबात कुरतडू नयेत कारण ती आरोग्यदायी सवय नाही. पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे प्रमाण योग्य ठेवा. नख मजबूत होण्यासाठी संतुलित आहार घ्या. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्या. नखे साफ करण्याचा सोपा उपाय कोमट पाण्यात भरपूर साबण लावून हात व नखे साफ करणे.

वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वाढलेल्या नखांच्या खोबणीत मळ, जंतांची अंडी, माती, इत्यादी पदार्थ साठतात. यातून स्वतःला व इतरांना संसर्ग होत राहतो. दर 2-3 आठवड्यांनी हातापायाची नखे काढावीत. लहान मुलांना नखे काढायची सवय लावावी.

दात घासणे

दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि हिरड्या सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दात, हिरड्या चोळून धुणे आवश्‍यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्‍यक आहे.

दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी (चावून धागे मोकळे झालेली) पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पुरतो. गोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडू, तुरट, तिखट, खारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते. दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते.

बाभूळ, कडूनिंब यांच्या काड्या दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पध्दत आहे. मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे. ब्रश वापरण्याची पध्दत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता ‘खाली-वर’ फिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील. हिरड्या बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरड्या चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो.

– श्रुती कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.