दैनंदिन आरोग्य : भोजन कसे किती आणि कोणते?

आरोग्यशास्त्र हे आपल्याला असे सांगते की, दैनंदिन कामे करीत असताना, शारीरिक, बौद्धिक कष्ट करीत असताना, धावपळ करीत असताना माणसांची जी शारीरिक शक्‍ती खर्ची पडते. ती शक्‍ती भरून काढण्यासाठी, शारीरिकचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी, शक्‍ती, ऊर्जा, उत्साह आणि क्रयशक्‍तीच्या लाभासाठी सकस पौष्टिक आहार घेणे फार गरजेचे असते.

भूक लागली की खावे हा आरोग्याच्या दृष्टीने एक खूप साधा आणि सोपा मंत्र आहे. आरोग्य तज्ज्ञ आणि सल्लागार मंडळीचे तर आपल्याला हेच सांगणे असते कि उत्तम आरोग्यासाठी साधारण दोन ते तीन तासांच्या अंतराने वारंवार सकस आहार घ्यावा.

व्यक्‍तीचे वयोमान, लिंगभेद, कामाचे स्वरूप, जीवनमान, राहणीमान, आवडीनिवडी आणि ऋतुमान यावर माणसांच्या आहाराचे कमी-जास्त प्रमाण हे ठरत असते. आहाराच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की फार कमी किंवा फार जास्त प्रमाणावर आहार करू नये. तर प्रत्येकाने आवश्‍यक तेवढा आणि योग्य तो आहार घेणे हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे.

हा सल्ला लक्षात घेऊनच साधारणपणे उठल्यापासून ते झोपेपर्यंत ज्या खाण्याच्या वेळा ठरवून दिल्या आहेत, त्या म्हणजे सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, नाष्टा आणि रात्रीचे भोजन. भोजन हा माणसाच्या दैनंदिन कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग आहे. आपण खाताना काय खातो, किती खातो यापेक्षा नेमक्‍या कोणत्या पदार्थांचा आपल्या खाण्यात समावेश आहे, याला आहाराच्या दृष्टीने फार महत्त्व असते.

ज्यामध्ये कर्बोदके, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि पोषक द्रव्ये आहेत असा समतोल आहार घेणे गरजेचे असते. वरील सर्व घटकांचा ज्याच्यामध्ये प्रमाणशील समावेश आहे, असा आहार म्हणजे समतोल आहार. असा समतोल आहार आपल्याला फळे, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, दूध, तेल तूप लोणी यासारख्या स्निग्धपदार्थांतून मिळतो. अन्नाचे जर आपण वर्गीकरण करायला गेले तर ते साधारणपणे असे करता येईल.

ऊर्जा देणारे पदार्थ- गह,ू तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, कंदमुळे आणि पिष्टमय पदार्थ- बटाटा, रताळी, सुरण, बीट, स्निग्धपदार्थ- तेल, तूप, साय, लोणी, इ.
जीवनसत्त्वे- फळे, पालेभाज्या, फळभाज्या इ. स्त्रिया आणि पुरुष यांची कामाच्या धावपळीच्या निमित्याने जी शारीरिक झीज होते. ती भरून काढण्यासाठी, आवश्‍यक तो उत्साह, कार्यक्षमता, ताकद टिकविण्यासाठी साधारणपणे महिलांना 1900 कॅलरीजची तर पुरुषांना अंदाजे 2350 कॅलरीजची गरज असते. ती गरज आपण योग्य प्रकारच्या आहाराची, त्यातील पदार्थांची निवड करून भरून काढू शकतो.

आपल्याला वरील आवश्‍यक असणाऱ्या जीवनसत्त्वांचा, पौष्टिक पदार्थांचा लाभ व्हावा म्हणूनच कि काय पण प्रामुख्याने आपल्या दुपारच्या जेवणाचे ताट हे पोळी भाजी वरण भात एखादी कोशिंबीर, लोणचे, मीठ, चटणी, आमटी ती यासारख्या पदार्थांनी भरलेले असते.

तसेच सोबत दही ताक ह्याचीही योजना केलेली असतेच. भोजनाच्या पदार्थात माणसाच्या वृत्ती, त्याच्या आवडीनिवडी यानुसार पदार्थांना प्राधान्य दिलेले आपण पाहतोच. उदा. पोळी आवडते तर कोणाला भाकरी, कोणाला दही, ताक आवडते तर कोणाला दूधतूप..

जेवणासंदर्भात आपल्याकडे आरोग्यशास्त्र, धर्मशास्त्र, शरीरशास्त्र यांनी अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. जेवायला बसण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, पानावर बसून पुढ्यातल्या अन्नास अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे मानून त्यास वंदन करून, ईश्‍वराचे स्मरण करून भोजनास प्रारंभ करावा.

जेवताना शांत आणि प्रसन्न मनाने जेवावे. घास नीट चावून खावेत, घाई करू नये, एकेक पदार्थ खाऊन त्याच्या गोड तिखट खारट आंबट या रसांचा आस्वाद घ्यावा. दुपारच्या प्रौढांच्या जेवणात काय किंवा लहान मुलांच्या जेवणात काय एखादा गोड पदार्थ असायला हरकत नाही.

नोकरीच्या निमित्याने प्रामुख्याने बराच मोठा गर्व हा दुपारचा रीतसर भोजनास मुकत असतो. त्यांना डब्यातील पोळी भाजी तीपण बहुतांश कोरडीच असे जेवावे लागते. कित्येक वेळा तर कामाच्या रामरणगाड्यात काहींना तर जेवायचीही फुरसत मिळत नाही, असे लोक अनेकदा फार काळ उपाशी राहतात. ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे लक्षात ठेवावे.

आपल्या शरीरास उपयुक्‍त ठरणारे जे पदार्थ खाणे आवश्‍यक आहे पण जे आपण ते दुपारच्या भोजनात घेऊ शकत नाही ते संघ्याकाळच्या भोजनात आवर्जून घ्यावेत. प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीमानाप्रमाणे, जे पदार्थ खाल्ले असता आपल्याला त्रास होतो असे पदार्थ खाऊ नयेत. माणसाच्या आहाराचा त्याच्या मनावर आणि वृत्तींवर परिणाम होत असल्याने प्रामुख्याने सर्वांनी उत्तम आरोग्यासाठी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते.

जेवणाचे संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपली जेवणाची वेळ कटाक्षाने सांभाळावी. ठराविक वेळी केलेले भोजन हेच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. भोजनास फार उशीर लागला तर पित्त उसळणे, पोटात कलकलणे, जीव कासावीस होणे, डोके चढणे या सारखे त्रास होऊ लागतात.

म्हणून प्रत्येकाने जेवणाची वेळ ही कसोशीने पाळायला हवी. यासाठी अगदीच अपरिहार्य कारणाशिवाय भोजनास उगाच विलंब होऊ देऊ नये. शिवाय, भुकेपोटी नेहमीच माणसाला चार घास जास्त जातात आणि ते खऱ्या अर्थाने त्याच्या अंगी लागतात हे विसरून चालणार नाही.

– मंजिरी गोखले

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here