दहिवडी : दहिवडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला भोंदूबाबा एकनाथ रघुनाथ शिंदे याने शिंदी बुद्रुक (ता. माण) येथील महिलेची जमीन नावावर करून घेण्यासाठी तिच्या बेपत्ता मुलाच्या नावाने कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.शिंदी बुद्रुक येथील द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर १९९७ मध्ये बिदालच्या नवमहाराष्ट्र विद्यामंदिरात आठवीमध्ये शिकत होता. एके दिवशी तो काही न सांगता निघून गेला. आणि बेपत्ता झाला. तो परत येईल या आशेवर त्याची आई अनेक वर्ष जीवन जगत होती. परंतु, मुलगा परत आलाच नाही. एके दिवशी गावामध्ये एकनाथ रघुनाथ शिंदे (रा. ओझर ता. जामनेर जि. जळगाव) भिक्षा मागण्यासाठी आला होता. त्यावेळी तो गावातील अनेकांची चौकशी करत होता.
त्यामध्ये द्वारकाबाई कुचेकर यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे आणि त्यांना तीन एकर जमीन हे त्याला समजल्यानंतर तो काही दिवसानंतर परत आला. आणि द्वारकाबाईंना वारंवार भेटू लागला. जवळीक साधून मीच तो सोमनाथ आहे असे सांगायचा आणि मीच सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असे सांगत फिरत होता. काही दिवसानंतर वृद्धापकाळाने द्वारकाबाई यांचे दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांचे वर्षश्राद्ध केले. त्यांनतर भोंदूबाबा याने मीच सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असे सांगून त्याने सर्व नातेवाईकांना सांगितले की दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी आईचे वर्ष श्राद्ध करायचे आहे.
त्यावेळी सर्व नातेवाइकांना शंका आल्यानंतर त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्याला कळविले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने सोमनाथ कुचेकर नावाची सर्व कागदपत्रे गोळा केली आणि त्याठिकाणी त्याचा फोटो लावून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि एटीएम काढून घेतले. त्यानंतर द्वारकाबाई यांच्या नावावर असलेली तीन एकर जमीन बळकविण्याचा त्याचा प्रयत्न होता. या सर्व प्रकाराबद्दल दहिवडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या भोंदूबाबाने कोणाची फसवणूक केली असेल तर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.