दखल: दहीहंडी सण की, राजकीय संधी…

जगदीश देशमुख

कोणत्याही सणामध्ये स्पर्धा आली की, त्याचे पावित्र्य संपते आणि सुरू होते जिंकण्याची जीवघेणी स्पर्धा. त्यात अशा स्पर्धेला राजाश्रय, नको तितकी प्रसिद्धी किंवा स्वार्थासाठी मुद्दामहून मिळवून दिली जात असेल तर अशा स्पर्धांवर कडक निर्बंध घातल्याशिवाय त्या सणामधील जीवघेणी स्पर्धा कमी होणारच नाही. दहीहंडी सणाचे असेच काहीसे झाले आहे…

गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस! गोकुळातच चोरून लोणी खाण्यासाठी घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी बाळकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. दहीहंडी म्हणजे धम्माल, नाचगाणी आणि उत्साह यांचा अनोखा संगम. सुमारे 10 वर्षांपूर्वी दहीहंडीच्या दिवशी नेमके हेच वातावरण असे. खेडेगावांत तसेच मोठ्या शहरांमधील गल्लोगल्ली आणि काही इमारतींमध्ये दहीहंडी लटकलेली दिसत असे. ती फोडण्यासाठी स्थानिक गोपाळकाला मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असे. “गोविंदा रे गोपाळा’ या गाण्याच्या ठेक्‍यावर गोविंदा येत आणि मोजक्‍याच रकमेची बक्षिसे असलेली हंडी फोडताना कार्यकर्त्यांमध्ये चुरसही लागे आणि सायंकाळी उशिरापर्यंत हंडी फोडण्याचे “धुमशान’ सुरू राहात असे.

पण, काळाच्या ओघात हा उत्सव बदलला आहे की, काही “आहे रे’ वर्गातील लोकांनी बदलवला आहे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. उत्सवामागची मूळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये ही धमाल, धुमशान संपली आणि हंडी फोडण्याचा कार्यक्रम लाखो रुपयांच्या बक्षिसांमध्ये तोलला जाऊ लागला आहे. दहीहंडी उत्सवाचे रूप पालटले. गोविंदा, गोपाळकाला, दहीहंडी या उत्सवातील संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे. मानवी मनोरे म्हणजे गोविंदा ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. राधेने मातीच्या मडक्‍यात ठेवलेले दही व लोणी खाण्यासाठी कृष्ण आणि सवंगडी एकमेकांच्या खांद्यावर चढून गुपचूप चोरून ते काढत.

त्यामुळेच श्रीकृष्णास माखनचोर म्हणत असत. अशा हंड्या फक्‍त घरातच लावल्या जायच्या. आजच्यासारख्या चौकात किंवा नाक्‍यावर मानवी मनोरे रचण्याचा प्रश्‍नच नव्हता. या सणाला राजकीय, सामाजिक रंग आला असून, लाखो रुपयांची बक्षिसे पटकावण्यासाठी ठिकठिकाणची गोविंदा पथके फिरत असतात. आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे मानवी मनोरे एकमेकांच्या खांद्यावर उभे राहतात. बऱ्याच प्रयत्नांनंतर उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी यश मिळते, पण या प्रयत्नांमध्ये हे थर कोसळून त्यात गोविंदा जखमी झाल्याच्या आणि काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

लाखो रुपयांचे बक्षीसरूपी लोणी मटकावण्यासाठी हा थरांचा खेळ सुरू होतो. पण ह्या हंडीला लाखोंचे लोणी लावणारे कोटींचे तूप मिळवतात हे किती गोविंदा पथकांना माहिती आहे. दहीहंडी सण राजकारण्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यात अनेक गुडांनीही स्वतःला “सोवळे’ करून घेण्याची संधी साधली आहे. अनेक “भाई’ लोकांनी आपली स्वत:ची दहीहंडी, गणपती, नवदुर्गा मंडळे स्थापन करून त्या माध्यमातून लाखो रुपयांची देणगी उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सामाजिक उत्सवातून व्यावसायिकता डोकावताना दिसत आहे. त्यातून उद्‌भवणारे वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणही त्यात माखला गेला आहे. राजकारणी लोक अशा सामाजिक महोत्सवाला भल्या मोठ्या देणग्या देऊन आपल्या पक्षाची व नावाची प्रसिद्धी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.

खरं तर दहीहंडीचा सण ज्या प्रकारे सध्या साजरा केला जातो, त्यामुळे भर रस्त्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडते. पोलीस यंत्रणेवर नाहक भार पडतो. आताचे राजकारणी इतके हुशार आहेत की, त्यांना कमी कष्टात जास्त लाभ मिळवण्याचे अनेक मार्ग माहीत आहेत. त्यातील एक म्हणजे सामाजिक मान्यता असलेला एखादा सण निवडायचा, त्याला स्पर्धेचे रूप येईल अशी त्याची आखणी करायची, एखाद्या नट किंवा नटीला बोलवायचे मग आपोआप मीडिया येते. नटीसोबत गैरवर्तन झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

समाजहिताची कामे करावी, समाजातील काही घटकांना न्याय मिळवून द्यावा, एखाद्या समस्येवर लढा द्यावा मग समाजानेच ठरवल्यावर त्यांच्या आग्रहास्तव राजकारणात प्रवेश करावा ही आता फार जुनी संकल्पना झालेली आहे. राजकारण्यांच्या ह्या शॉर्टकटमुळे मात्र अनेक सणांचे पावित्र्य संपत चालले आहे. फक्‍त दहीहंडीच नाही तर गणेशोत्सव, नवरात्र आणि अन्य अनेक सण उत्सव ह्याला बळी पडत आहेत. समाजातील “आहे रे’ वर्गाचा हा डाव, सापळा वेळीच लक्षात घेतला पाहिजे. नाहीतर आनंदासाठी सण उत्सव असतात हे आपण सगळे विसरून जाऊ आणि सण उत्सव म्हणजे जीवघेणी स्पर्धा हेच आपल्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढींवर लादले जाईल.

हंडीला थोडे लोणी लावून ते मिळवण्यासाठी “नाही रे’ वर्गामध्ये जीवघेणी स्पर्धा लावून दिली जाईल आणि तुपाची धार मात्र “आहे रे’ वर्गाच्या अर्थातच राजकारणी लोकांच्या भातावर पडत राहील अखंडपणे, अव्याहतपणे…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.