दादोजी कोंडदेव शाळेत मेट्रो स्टेशन

बाधितांना दिलासा : ब्रिजेश दीक्षित यांची माहिती

पुणे – कसबा पेठेतील फडके हौद चौकात मेट्रोचे होणारे भूमिगत स्थानक आता तेथीलच महापालिकेच्या दादोजी कोंडदेव शाळेत होणार असल्याने, तेथे बाधित होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. “महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

“महामेट्रो’तर्फे भूमिगत मेट्रोच्या कामाला स्वारगेट आणि कृषी महाविद्यालय येथे सुरू झाले आहे. भुयारी मेट्रो ज्या मार्गावरून होणार आहे. त्यामध्ये कसबापेठेचा भाग येतो. तेथील सुमारे दोनशे ते अडीचशे घरे बाधित होणार होती. या नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. वास्तविक महामेट्रोने त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्या नागरिकांनी “महामेट्रो’ला दादच दिली नाही. त्यांनी कृती समिती स्थापन करून या निर्णयाला जोरदार विरोध केला.

तसेच, महामेट्रोकडून करण्यात येणाऱ्या विविध सर्वेक्षणांनाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, किंवा सहकार्यही केले नाही. या प्रश्‍नामध्ये अखेर शहराचे पालकमंत्री या नात्याने आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार या नात्याने गिरीश बापट यांना त्यामध्ये लक्ष घालण्याची आणि हा प्रश्‍न सोडवण्याची विनंती करण्यात आली. त्यांनाही या नागरिकांनी दाद दिली नाही.

अखेर फडके हौद चौकाजवळ असलेल्या महापालिकेच्या दादोजी कोंडदेव शाळेमध्ये मेट्रोचे स्थानक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात बापट यांनी यासंदर्भात सुतोवाच केले होते. मात्र, या शाळेमध्ये स्टेशन करता येईल का यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे बापट म्हणाले होते. मात्र, त्यावर निर्णय झाल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

मेट्रो कामाला मिळणार गती
या ठिकाणी कशाप्रकारे स्टेशन करायचे याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच, याठिकाणची गर्दी, वाहने, एकेरी वाहतूक या सगळ्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येथे बाधित होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा विरोध मावळण्याची शक्‍यता आहे. हा राजकीय विरोध होता असे बापट म्हणाले होते. मात्र, आता या विरोधाचे मूळच बाजूला झाल्याने, मेट्रोच्या कामाला गती मिळणे सोपे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.