दादांच्या भाजप प्रवेशाने आबांच्या गोटात काळजीचे ढग

अंतर्गत दुफळी अन्‌ ज्येष्ठांच्या नाराजीने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार
मयूर सोनावणे

सातारा – माजी आमदार तथा किसन वीर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले यांचा नुकताच भाजप प्रवेश संपन्न केला. दादांच्या प्रवेशाने वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदार संघात भाजपला खऱ्या अर्थाने सेनापती भेटला असे वक्तव्य दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच केले. त्यामुळे दादांच्या प्रवेशाने मतदार संघातील भाजपची ताकद निश्‍चितच वाढली असून राष्ट्रवादीच्या गोटात मात्र काळजीचे ढग गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांच्याविषयी जनमताचा कौल चांगला असला तरी पाच वर्षांतील विकासकामांचा वेग पाहता आणि नाही म्हटलं तरी पक्षांतर्गत वाढत असलेली दुफळी भाजपच्या अर्थात मदनदादांच्या पथ्यावरही पडू शकते, असे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आणि वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा मतदार संघाची उमेदवारी ही राष्ट्रवादीला म्हणजेच आमदार मकरंद पाटील यांना मिळणार हे निश्‍चित होते. त्यामुळे मतदार संघात आमदारांना डोईजड जाणारा दुसरा कोणताही उमेदवार नव्हता. मात्र, रविवार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केल्याने जसा विचार आमदारांनी केला तितकी ही निवडणूक आमदारांसाठी नक्कीच सोपी राहिलेले नाही, हे मात्र निश्‍चित कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार तसेच शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली आहेत यासह अनेक आरोपांच्या फैरी करुन आमदार गटाने मदनदादा भोसले यांना कोंडीत पकडण्याचा जमेल तेवढा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी तयार केलेले अडचणींचे चक्रव्यूह भेदून अखेर मदन भोसले यांनी शेतकऱ्यांची थकित बिले, कामगारांचे पगार दिलेच याशिवाय यंदाचा हंगामही मोठ्या दिमाखात यशस्वी करुन दाखवत आपण अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहोत हेच दाखवून दिले आहे.

किसन वीर कारखान्याला कर्ज उलब्ध होऊ नये यासाठी विरोधी राष्ट्रवादी गटाने सर्व पातळीवर प्रयत्न केले. एकीकडे आपणच कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आणून किसन वीरच्या अडचणी वाढविण्याचा लाजिरवाना उद्योग विरोधकांकडून सुरु होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मदनदादांवर विश्‍वास ठेवत किसन वीरला कर्ज उपलब्ध करुन देण्यात मोलाचे सहकार्य केल्यानेच मदनदादा विरोधकांचे चक्रव्यूह भेदू शकले हेही तितकेच खरे आहे. मात्र, दादांचा या चक्रव्युहातून बाहेर येण राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते.

दरम्यान, किसन वीर कारखान्यासमोर अडचणींचा डोंगर होता मात्र, हा डोंगर वाढविण्यासाठी आणि कारखाना अडचणीत आणण्यासाठी म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्यात विरोधी राष्ट्रवादी गटाचाच मोठा वाटा असल्याचे दादांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधात शेतकरी वर्गात रोष वाढीला लागला असून आगामी निवडणूकीत याचा नक्कीच परिणाम होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांना एकहाती सत्ता मिळेल अशी राष्ट्रवादीप्रेमींचा गोड गैरसमज निष्फळ ठरणार हे मात्र नक्की.

ज्येष्ठांची नाराजी राष्ट्रवादीला पडणार महाग?

जिल्हा बॅंक, तसेच जिल्हा परिषद अन्‌ पंचायत समिती निवडणुकांमध्ये खंडाळा तालुक्‍यातील काही ज्येष्ठ नेत्यांना आमदारांकडून डावलल्याचे मोठी चर्चा मतदार संघात होती. ही चर्चा त्यावेळी शांत झाली असली तरी आगामी निवडणुकीत ज्येष्ठांच्या नाराजीची भडास निघण्याची शक्‍यता वर्तविली जात असून ज्येष्ठांची नाराजी आमदारांना महागात पडणार का? तसेच राष्ट्रवादीतील नाराज कमळाच्या सावलीला जाणार का? यासह अनेक उलटसुलट चर्चा आत्तापासूनच वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदार संघात रंगू लागल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)