पुणे – कोथरूडकर सहजासहजी कोणाला आपलंसं करत नाही. मात्र, नागरिकांशी आदरपूर्वक संवाद, विकासकामांसह नागरिकांच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून जाणारा आणि कोथरूडचा सुसंस्कृत चेहरा जपणाऱ्याला कोथरूडकर आपलेसे करतात, हे आज चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी दिलेल्या मताधिक्यांतून दिसून आले. एवढच नव्हे, तर मागील पाच वर्षांत पाटील यांनी नागरिकांशी नाळ जोडल्यामुळे आमचा दादा कोथरूडकरच, असे निकालातून सांगितले आहे.
२०१४ मध्ये महायुती तुटली आणि शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. या वेळी डाॅ. मेधा कुलकर्णी ६४ हजार ६६२ मताधिक्य मिळवत कोथरूडचा बालेकिल्ला भाजपकडे घेतला. २०१९ मध्ये डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच, कोथरूडमध्ये भाजपच्या गोटातून नाराजीचा सूर निघाला. या वेळी बाहेरचा आणि आयात उमेदवार, असे म्हणून पाटील यांना विरोध झाला.
मात्र, पाटील भाजपमधील वरिष्ठ नेते, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पराभव झाला तर आपली काही खैर नाही, यामुळे भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोर लावला आणि पाटील यांना 2५ हजार मतांनी विजयी केले. या वेळी उमेदवार दुसरा असता आणि सर्व पक्षांनी मिळून ताकद लावली असती, तर चित्र वेगळे असते.
कोथरूडच्या आमदारपदी चंद्रकांत पाटील विराजमान होताच, पहिल्या दिवसांपासून पाटील यांनी कोथरूडकरांशी संवाद साधायला सुरुवात केली. गाठीभेटी, बैठका सुरू झाल्या. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांचा फौजफाटा तयार केला.
नागरिकांच्या आनंदासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. मागील पाच वर्षांत पाटील यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत एक आपुलकीची नाळ जोडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि पुन्हा बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी निवडणुकीची रंगत सुरू झाली. मात्र, कोथरूडकरांनी पाटील यांना दिलेल्या मताधिक्यातून दादा आमचाच, या आपुलकीतून मिळाल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले.
कोथरूडचे सर्व रेकाॅर्ड मोडले
कोथरूड विधानसभा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे २०१४ च्या विधानसभेत भाजपला ६४ हजारांचे मताधिक्य मिळाले. २०१९ मध्ये लोकसभेला गिरीश बापट यांना कोथरूडमधून १ लाख ६ हजारांचे मताधिक्य मिळाले, तर मागील विधानसभेत चंद्रकांत पाटील यांना २५ हजारांचे मताधिक्य होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेत मुरलीधर मोहोळ यांना ७४ हजारांचे मताधिक्य होते. मात्र, आजच्या (शनिवार) निकालात चंद्रकांत पाटील यांना रेकाॅर्ड ब्रेक १ लाख १२ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.