पुणे भाजपात आता दादा, भाऊंचा गट?

पाटलांच्या बैठकीला बापट समर्थक अनुपस्थित : चर्चेला उधाण

पुणे – वेगवेगळ्या बैठका तसेच कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रम तसेच बैठकांना खासदार गिरीश बापट यांच्या समर्थकांनी दांडी मारल्याचे चित्र शुक्रवारी शहरात पहायला मिळाले. एरव्ही पालकमंत्रिपदी असताना, महापौर बंगल्यावर बापट यांनी बैठका ठेवल्या असताना, उपस्थित राहणारे बापट सर्मथक शुक्रवारी महापौर बंगल्यावर तुरळकच असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे पुणे भाजपमध्ये दादा विरुद्ध भाऊ असा गट तयार होत असल्याची राजकीय चर्चा आहे.

पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी कार्यक्रम-बैठकांना हजर राहून जनसंपर्काचा धडाका लावला. मात्र, या कार्यक्रमांना माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट पाठ फिरवित असल्याची कुजबूज भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. आजही असेच चित्र होते. पालकमंत्री पाटील यांनी पीएमआरडीएच्या कार्यालयात बैठक, प्राधिकरणातील समस्यांचा आढावा, पुणे विद्यापीठ, विभागीय आयुक्‍त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक, जिल्हा परिषदेमध्ये आढावा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक तसेच महापौर बंगला येथे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

या दौऱ्यामध्ये बापट समर्थक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी पाटील यांच्या दौऱ्यापासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून आले. महापौर बंगला येथे झालेल्या गाठी-भेटीच्या कार्यक्रमात महापौर मुक्‍ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह मोजके कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे पुण्यात भाजपमध्ये गट तयार होत असून ही गटबाजी वाढण्याची शक्‍यताही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.