बापरे! अविश्‍वास ठराव दाखल केल्याने सदस्यांवर सशस्त्र हल्ला

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या सभापतींचा कारनामा

पुणे – खेड पंचायत समितीचे राजकारण आता थेट हाप मर्डरपर्यंत पोहोचले असल्याने तालुक्यातील राजकारण तापले आहे. खेड पंचायत समितीचे सभापती भगावान पोखरकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या शिवसेनेच्या सदस्यांसह इतर पक्षांच्या सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता.

याचा राग मनात धरत भगवान पोखरकर यांनी हे सदस्य अज्ञातवासात असलेले स्थळ गाठात त्यांच्यावर गोळाबार करीत सदस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे खेडसह संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ माजली असून राजकीय वादातून हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी खडकवासला परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महिला, पुरुष सदस्यांसह महिला सदस्यांच्या पतींवर आज पहाटेच्या सुमारास 40 ते 50 गुंडांसह हा हल्ला केला. यात सुनिता संतोष सांडभोर, वैशाली गणेश जाधव, सुभद्रा विष्णु शिंदे, मंदा सखाराम शिंदे, वैशाली संतोष गव्हाणे, सखाराम शिंदे, संतोष सांडभोर, प्रसाद काळे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे दि. 24 मे रोजी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्याबाबत दि. 31 मे 2021 रोजी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतदान होणार आहे. अगोदरच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सभापती भगवान पोखरकर यांच्या दहशतीला घाबरून खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे सहा सदस्य, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य खडकवासला गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर परिवारासह येऊन थांबले होते.

दरम्यान, बुधवारी (दि. 26) रात्रीपासूनच भगवान पोखरकर हे गुंडांसह या सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते आणि गुरुवारे (दि. 27) पहाटे त्यांनी डाव साधत त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांनी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या रूमचे दरवाजे तोडून महिला पंचायत समिती सदस्य आणि त्यांच्या पतींना कोयते, गज व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

यावेळी भगवान पोखरकर यांनी सखाराम शिंदे, संतोष सांडभोर व प्रसाद काळे यांचे अपहरण करून त्यांना जबर मारहाण करून नांदेड-शिवणे पुलाजवळ सोडून दिले. तसेच भगवान पोखरकर यांचा भाऊ जालिंदर पोखरकर याने पिस्तूलानेे हवेत गोळीबार केल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, उपाधीक्षक राहुल आवारे, हवेली, पौड आणि वेल्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.