वाहनचालकांची लूट करणारी टोळी कोपरगावात जेरबंद

पाच अटकेत, एक पळून जाण्यात यशस्वी ः कोपरगाव शहर पोलिसांची कामगिरी

कोपरगाव – वाहनचालकांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना लुटणाऱ्या टोळीस कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पाच जणांना अटक केली असून, त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
22 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर शिवसाई पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलवर आलेल्या चौघांनी अनिल बर्डे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. तसेच त्यांच्याजवळील एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला होता.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार या गुन्ह्यातील एका आरोपीस पोलिसांनी कोकणगाव (ता. संगमनेर) येथे रंगेहात पकडले. त्यानंतर अन्य चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. एक जण अद्याप फरार आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पो. कॉ. राजू भोर, पो. कॉ. पद्मकुमार जाधव, शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो. हे. कॉ. इरफान महेबूब शेख, सायबर सेलचे पो. कॉ. प्रमोद जाधव, पो. कॉ. फुरकान शेख, गोकुळदास पळसे यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी आकाश ऊर्फ अक्षय युवराज अहिरे (वय 22, रा. लिंभारा मैदान, कोपरगाव) यास कोकणगाव येथून पाठलाग करून ताब्यात घेतले.

प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्हायीत त्याचे सहकारी अप्पासाहेब ऊर्फ अप्पा भाऊसाहेब आव्हाड (वय 20, रा. लिंभारा मैदान, कोपरगाव), अनिल अप्पासाहेब गांगुर्डे (वय 21, रा. लक्ष्मणवाडी, कासली रोड, संवत्सर), दत्तू ऊर्फ बाळू अशोक चव्हाण (वय 24, रा. दहेगाव बोलका) यांना ताब्यात घेतले. तसेच विनोद पवार (रा. दशरथवाडी, संवत्सर, ता. कोपरगाव) हा अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकून पोलिसांनी 23 हजार 500 रुपये रोख, हिरो होडा, पल्सर, ऍक्‍टिव्हा, अशा तीन मोटारसायकली, तीन मोबाईल हॅंडसेट, असा एकूण 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.