#Prokabaddi2019 : नवीनकुमारची निर्णायक चढाई; दबंग दिल्लीचाच जोश

हैदराबाद – तमिळ थलाईवाजच्या मनजित चिल्लरने शेवटची 10 सेकंद बाकी असताना दबंग दिल्लीच्या नवीनकुमारची पकड करण्याचा आततायी प्रयत्न केला. त्याची ही चाल फसली आणि दबंग दिल्ली संघास 30-29 असा रोमहर्षक विजय मिळाला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत 10 गुणांसह अग्रस्थानावर झेप घेतली आहे.

गचीबावली स्टेडियमवर शेवटची पाच मिनिटे बाकी असताना थलाईवाजकडे 28-21 अशी आघाडी होती. त्यावेळी सामना आपणच जिंकणार अशा भ्रमात त्यांचे खेळाडू होते. मात्र, कबड्डीत शेवटच्या चढाईपर्यंत सामन्यास कलाटणी मिळू शकते त्याचाच येथे प्रत्यय आला. मनजित हा जेवढा पकड करण्यात चतुरस्त्र मानला जातो, तेवढाच तो घाई करीत संघाचे नुकसानही करतो असे अनेक वेळा दिसले आहे.

आजही त्याचाच प्रत्यय घडला. सामन्यातील शेवटची चढाई करण्याची संधी नवीनकुमारला मिळाली. खरंतर त्याच्यासाठी ही “डू ऑर डाय’ चढाई होती. त्याची पकड करण्याचा प्रयत्न झाला नसता तर हा सामना 29-29 असा बरोबरीत राहिला असता. तो बाद होणार असे वाटत असतानाच मनजितने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि, नवीनकुमारने त्याची ही चाल त्याच्यावरच उलटविली आणि संघास सनसनाटी विजय मिळवून दिला.

कबड्डीमध्ये सांघिक कौशल्य महत्त्वाचे असते. दिल्लीच्या खेळाडूंनी पल्लेदार चढाया व भक्कम पकडी करीत शेवटची चार मिनिटे बाकी असताना थलाईवाजवर लोण नोंदविला. तेथेच थलाईवाज संघाची सामन्यावरील पकड निसटली. नवीनकुमार (8), मिराज शेख (6) व जोगिंदरसिंग नरवाल (4) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

थलाईवाज संघाची मुख्य भिस्त राहुल चौधरी व अजय ठाकूर यांच्या चढायांवर आहे हे ओळखूनच दिल्लीने या दोन खेळाडूंना फारसे यश मिळणार नाही याची खबरदारी घेतली. राहुल याला केवळ 7 गुण तर ठाकूरला 5 गुण नोंदविता आले.पूर्वार्धात थलाईवाजने 18-11 अशी आघाडी मिळविली होती. तथापि दिल्लीच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळ करीत विजयश्री खेचून आणली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.