DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने शासकीय कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ मंजूर केली असून, हा भत्ता आता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांकडून सातत्याने महागाई भत्ता वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनानेही हा निर्णय घेतला. हेही वाचा – पीएम मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय शासन निर्णयानुसार, केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्ता लागू राहणार आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२६ पासून ६० टक्के दराने महागाई भत्ता देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यातील या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतनश्रेणीनुसार वाढ होणार आहे. विशेषतः वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.