पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड.) प्रवेशासाठी आतापर्यंत केवळ 9 हजार 552 उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी येत्या 6 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यंदा डी.एल.एड.च्या प्रवेशासाठी 591 महाविद्यालयांनी नोंदणी केली.
35 हजार 864 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या. त्यात शासकीय कोट्यातील 23 हजार 605, तर व्यवस्थापनाच्या कोट्यातून 12 हजार 259 प्रवेशाच्या जागा आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी 17 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध करून दिली. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती.
2012 पासून शिक्षक भरतीला बंदी होती. मागच्या वर्षात त्यावरील स्थगिती उठविली. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू करण्यात आली. 6 हजार जागाही भरल्या. मात्र, राज्यात करोना प्रादुर्भाव वाढल्याने शासनाकडून लॉकडाऊनही केला होता. यामुळे शासन आर्थिक अडचणीत सापडले. आर्थिक काटकसर करण्याच्या अनुषंगाने शासनाने नवीन पदभरतीला बंदी घातली. यात शिक्षक भरतीचाही समावेश आहे.
डी.एल.एड. झालेल्या अनेक उमेदवारांना अद्यापही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रवेशासाठी अपेक्षित अर्जच दाखल झालेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.