डी. बी. कदम यांच्या पुतळ्याचे रविवारी आरळे येथे अनावरण

सातारा – किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आमदार डी. बी. कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय क्रृषमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. 24 रोजी आरळे, ता. सातारा येथे होत आहे, अशी माहिती डी. बी. कदम सांस्कृतिक प्रतिष्ठानचे खजिनदार अरविंद कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. अरविंद कदम म्हणाले, डी. बी. कदम सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने माजी आमदार डी. बी. कदम यांच्या स्मृती गेल्या अनेक वर्षांपासून जागवण्यात येत आहेत.

कदम यांनी 1980-85 या कालावधीत जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1979 मध्ये ते समांतर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. राजकारण व सहकार या दोन्ही क्षेत्रात त्यांचे योगदान होते. 1974 साली ते किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले होते. आरळे गामस्थांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांस्कृतिक भवन व पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण शरद पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोहळ्याचे निमंत्रक माजी आमदार शशिकांत शिंदे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, सचिव महादेव कदम यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.