Cylinder Truck Accident – आळंदी फाटा-आळंदी रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटला. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशामक दल आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अपघात होताच ट्रकमधील गॅस सिलिंडर रस्त्यावर अस्ताव्यस्त विखुरले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिस आणि अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही गॅस गळती झाली नसल्याची खात्री अग्निशामक दलाने केली. त्यामुळे संभाव्य स्फोट किंवा मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने आळंदी फाटा-आळंदी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावर विखुरलेले सिलेंडर हटवण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले होते. पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.