चंदननगर पोलिसांकडून गुन्हे दाखल; 796 रुपयांच्या सिलिंडरची 1 हजार रुपयाने विक्री
पुणे – बेकायदेशीर सिलिंडरचा साठा करून काळाबाजार करत जादादराने विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अमित सुगंधचंद गोयल (वय 30, रा. कोडियाड सोसायटी, चंदनगर) याच्याविरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोयल याच्या ताब्यातून विविध गॅस कंपन्यांचे भरलेले 16 सिलिंडर, रोकड, 48 ग्राहक उपभोक्ता कार्ड असा 33 हजार 733 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, खडकी परिसरातदेखील अशाच प्रकारे एका गॅस वितरकासह त्याच्या साथीदारांना सिलिंडरचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यामुळे शहरातील काही भागांत ग्राहकांची अडवणूक करून जादा दराने वस्तू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनिरीक्षक विजय झंजाड हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद यांना बातमीदारामार्फत सागर पार्क लेन नंबर 2 वडगावशेरी येथे एक गॅस एजन्सीधारक शासनाच्या आदेशाचा भंग करून 796 रुपयांचा गॅस सिलिंडर 1 हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गॅस सिलिंडरची खरेदी करण्यासाठीचा सापळा लावला. त्यावेळी आरोपी गोयल हा त्याच्याकडे सिलिंडर विक्री करण्यासाठी कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलिंडरची जादा दराने विक्री करताना आढळून आला. ही कामगिरी उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे, संदीप मुंढे, दीपक चव्हाण, मोहन वाळके, आबा गावडे, अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ
यांनी केली.