रायगड : रायगडच्या माणगाव तालुक्यातील विळे भागात औद्योगिक वसाहतीत क्रिपझो इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात 17 जण जखमी झाले. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या कंपनीत ऑक्सिजनचे सिलेंडर तयार केले जातात. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत आग लागली. यात कामगार भाजले गेले. हा स्फोट नेमक्या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेचे वृत्ते कळताच महाडचे आमदार भरत गोगावले यांनी माणगावच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देवून जखमींची विचारपूस केली . जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी नवी मुंबईत पाठवण्यासाठी हालचाली केल्या. हा स्फोट नेमका कसा झाला, त्यामागची कारणं काय याचा शोध तपास यंत्रणांनी घेतला पाहिजे तसेच त्याई ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती का, कंपनी व्यईवस्थापनाची भूमिका काय आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यायत यावी अशी मागणी गोगावले यांनी यावेळी केली.