Cyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या  चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ओएनजीसी’चं पी ३०५ (पापा-३०५) मोठे जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले होते. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे.

नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चे  जहाज पी ३०५ उभे  होते. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झाले.

चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आले  होते, असे ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.


आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौकांबरोबरच मदतीलाओएनजीसीची समुद्र किनाऱ्यालगत असलेली ओएसव्ही आणि तटरक्षक दलाचं आयसीजी समर्थ या दोन नौकाही मदत कार्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजाने जलसमाधी घेतली असून, असलेल्या २६० जणांपैकी १४७ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आले आहे.

सकाळपासून इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदलाचे पी ८१ हे जहाज समुद्रात इतरांचा शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनारलगत तैनात असणाऱ्या एनर्जी स्टार आणि अहल्या या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.