नवी दिल्ली – गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेकडील आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले आहे. हवामान कार्यालयाने सांगितले की, समुद्रातील हा कमीदाबाचा पट्टा गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 950 किमी, मुंबईपासून 1,100 किमी, पोरबंदरपासून 1,190 किमी आणि कराची पासून 1,490 किमी अंतरावर आहे.
ही सकाळी साडे आठ वाजताची स्थिती होती. तो उत्तरेकडे सरकण्याची आणि पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात चक्री वादळात रूपांतरीत होण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. चक्रीवादळ गुरुवारी सकाळपर्यंत तीव्र चक्री वादळात आणि शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अति तीव्र चक्री वादळात रुपांतर करण्याची शक्यता आहे.
6 जून रोजी केरळ-कर्नाटक किनारपट्टी, लक्षद्वीप-मालदीव भागात आणि 8 जून ते 10 जूनपर्यंत कोकण-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर खूप उंच लाटा धडकण्याची शक्यता आहे. समुद्रात असलेल्या मच्छिमारांना किनारपट्टीवर परत जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा केरळातील मान्सुनच्या स्थितीवरही विपरीत परिणामाची शक्यता आहे असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. केरळमध्ये 8 जून किंवा 9 जून रोजी मान्सूनची सुरुवात होऊ शकते परंतु तो मंद किंवा सौम्य स्वरूपाचा असेल असे स्कायमेट वेदरने म्हटले आहे.