शहरात केवळ 10 ठिकाणीच पुणेकरांसाठी सायकल उपलब्ध
पुणे – मोठा गाजावाजा करत अवघ्या दीड वर्षांपूर्वी महापालिकेकडून सुरू केलेली पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना अखेरच्या घटका मोजत आहे. शहरात केवळ 8 ते 10 ठिकाणीच या योजनेतील सायकल पुणेकरांसाठी उपलब्ध असून या योजनेत सहभागी झालेल्या 4 मधील 3 कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला असून उर्वरित एक कंपनीही पुण्यातून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या योजनेसाठी महापालिकेने केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला असल्याचे समोर आले आहे.
सायकलीचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला गतवैभव प्राप्त करून देणे तसेच शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना तयार केली. त्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या अनुदानातून महापालिकेने शहरासाठी एकात्मिक सायकल आराखडा केला. त्याला केंद्राकडूनही चांगला उपक्रम म्हणून पालिकेस 2 कोटीचे अनुदान देण्यात आले. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दीड वर्षांपूर्वी या योजनेचा मुहूर्त मिळाला.
त्यासाठी कोट्यवधींचे नवीन सायकल ट्रॅक, जुन्या ट्रॅकची दुरुस्ती, शहरात सायकल पार्किंगचे बोर्ड, त्यासाठीचे पट्टे यावर लाखो रुपये उधळपट्टी करत या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी पालिका तसेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जगभरात सायकल पुरविणाऱ्या कंपन्यांना साकडे घालण्यात आले. त्यात चार कंपन्या सहभागी झाल्या तसेच त्यांनी पाहिले 6 महिने सुमारे 10 हजार सायकल उपलब्ध करून दिल्या. त्याला पुणेकरांनीही प्रतिसाद दिला. मात्र, काही महिन्यांतच सायकल चोरीचे वाढलेले प्रकार, सायकलची होणारी तोडफोड, तसेच पुणेकरांचा घटलेला प्रतिसाद यामुळे या कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे.
3 कंपन्यांची माघार
योजनेत पेडल-झुमकार, ओफो, मोबाइक आणि युलु या चार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यातील ओफो कडून सुरुवातीला मोफत सायकल देण्यात आल्या तर, इतर 3 कंपन्या नाममात्र शुल्क आकारत होत्या. मात्र, आता पेडल, ओफो तसेच मोबाइकने आपल्या सायकली काढून घेतल्या आहेत. तर केवळ युलु या कंपनीच्या सायकल शहरात असून त्याही केवळ 8 ते 10 ठिकाणीच आहेत. तर या कंपनीच्याही शेकडो सायकल गायब असून शेकडो सायकलची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे ही कंपनीही आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.