अबाऊट टर्न-सायबोर्ग

हिमांशू
आता एखादी घागर पाण्यावर उपडी ठेवून त्यावर एकेकाला उभं करून “”मी खोटं बोललो तर बुड बुड घागरी” म्हणण्याचाच पर्याय शिल्लक राहिलाय. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, हे कसं ठरवणार? आणि ज्यांनी इमानदारीत लायनीत उभे राहून मतदान केलं त्यांनी हे काम का करायचं? त्यांना कुणाच्या खऱ्या-खोट्यात इंटरेस्ट असायचं कारण काय आणि गरज तरी काय? शेती उद्‌ध्वस्त झाली म्हणून मोर्चा काढणाऱ्यांना कुणापुढे कैफियत मांडायची हे कळेनासं झाले.

नासलेले कांदे आणि सडलेली द्राक्षं घेऊन लोक मुंबईत दाखल झाले खरे; पण ही वाया गेलेली संपत्ती दाखवायची कुणाला? राजभवनापासून दूर मोर्चा अडवून पोलिसांनी मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांना उचललं. सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात असती, तर गाऱ्हाणं कुणापुढे मांडायचं हे तरी किमान समजलं असतं. पण बेंबीच्या देठापासून विलाप करणाऱ्या शेतकऱ्यांचं मीडियानंसुद्धा अगदी थोडाच वेळ ऐकलं. नंतर पुन्हा कुणाचे, किती आमदार कुणाच्या संपर्कात आहेत, याचा हिशेब सुरू झाला. हा खऱ्या-खोट्याचा खेळ एकदाचा संपवा राव! बंद खोलीत काय घडलं, हे कसं काय शोधून काढायचं? विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचीही मदत आपल्याला याकामी घेता येत नाही. अजून तरी आपण बहुतांश माणसांच्याच रूपात आहोत. अर्धमानव, अर्धयंत्र असा “सायबोर्ग’ बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी ती अजून “कॉमन’ झालेली नाही.

विषय निघालाच आहे तर या सायबोर्गबाबत मतमतांतर जाणून घेणं क्रमप्राप्त आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा आनंद असला, तरी त्यात वाहवत जाऊ नये, माणूसपण संपवणारं तंत्रज्ञान आंधळेपणानं स्वीकारू नये, असं अनेकजण म्हणतात. त्यात काही शास्त्रज्ञही आहेत. अगदी स्टीफन हॉकिंग यांनीसुद्धा आर्टिफिशियल इन्टेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाच्या अनिर्बंध वापरामुळं होऊ शकणारे धोके सांगितले होते. “सायबोर्ग’ हा शब्द पहिल्यांदा ऐकू आला, तेव्हा सारं काही कपोलकल्पित वाटले. माणसाची ही पुढची आवृत्ती. म्हणजे आपण यंत्रमानव बनवला, तसं “मानवयंत्र’ बनवायचे. यंत्राला माणूस बनवलं तसं माणसाला यंत्र बनवायचे. यांत्रिक त्वचा काही वर्षांपूर्वीच तयार झाली होती.

ती शरीरावर कुठेही धारण केली तरी आपले ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, पल्स रेट वगैरे मोजत राहते आणि धोक्‍याची सूचना देते. असेच “रोबोटिक्‍स’ तंत्रज्ञानावर चालणारे एकेक यांत्रिक अवयव माणसाच्या शरीरात “इन्स्टॉल’ केले की “सायबोर्ग’ तयार होतो. ब्रिटनचे डॉ. पीटर स्कॉट हे मोठे शास्त्रज्ञ. त्यांना एक दुर्धर आजार जडला. या आजारात स्नायू हळूहळू काम करणे बंद करतात. या आजारावर उपचार उपलब्ध नसल्यामुळं त्यांनी स्वतःचे रूपांतर सायबोर्गमध्ये करण्याचा निर्णय घेतला. एकेक अवयव बदलत गेला. यांत्रिक होत गेला.

आजमितीस त्यांचा चेहरा आणि हावभावही यांत्रिक झालेत. चेहऱ्याचे स्नायू डोळ्यांच्या इशाऱ्यावर भावना व्यक्‍त करतात. हा नव्या माणसाचा नवा चेहरा! सायबोर्गमध्ये माणसाचे तंतू आणि यंत्राचे सर्किट एकत्रित काम करते म्हणे! तो काय खाऊन जगतो, कोण जाणे! आपण सगळेच सायबोर्ग झालो तर कदाचित शेतीची गरजच नसेल. म्हणूनच आपण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रॅक्‍टिस करतोय… तूर्त दोनच प्रश्‍न. सायबोर्ग खोटे बोलेल का? खऱ्याखोट्याची शहानिशा करू शकेल का?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here