बोस्टन – लक्षावधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत सायबर सिक्युरिटी तज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या सॉफ्टवेअरमुळे ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे हॅकिंगला अनुकूल बनली असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
विशेषतः उद्योग आणि घरगुती वापराच्या संगणकांचे हॅकिंग केले जाऊन यंत्रणेला बाधा पोहोचवली जाऊ शकते. या असुरक्षिततेचा फायदा घेऊन हॅकिंग केले गेल्याचा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नाही. मात्र इंटरनेटच्या आधारावरील डेटा कम्युनिकेशन सॉफ्टवेअरबाबत “यूएस सायबरसिक्युरिटी ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’ने आपल्या निवेदनात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नेटवर्क्ड थर्मोमीटर पासून स्मार्ट प्लग, प्रिंटर, ऑफिसमधील राउटर्स आणि आरोग्यसेवेशी संबंधित उपकरणे आणि औद्योगिक नियंत्रण यंत्रणांमधील काही घटकांचे उत्पादन करणाऱ्या सुमारे 150 उत्पादक कंपन्यांची उत्पादने अंशतः परिणाम झालेली असल्याचे फोरस्काऊट टेक्नॉलॉजीज या सायबर सिक्युरिटीशी संबंधातल्या कंपनीने मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रिमोट कंट्रोलने नियंत्रित केल्या जाणाऱ्या टेम्परेचर सेन्सर आणि कॅमेऱ्यांना या हॅकिंगचा धोका असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिमोट कंट्रोलद्वारे पाणी, वीज आणि ऍटोमेटेड बिल्डींग मॅनेजमेंटसशी संबंधित उपकरणेही यामुळे असुरक्षित बनली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी हॅकिंगचा धोका टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय करावेत असे ब्रिटनमधील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमधील संगणक वैज्ञानिक ओविस रशीद यांनी सांगितले