नागपूर – सायबर गुन्हेगारांनी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाच्या खात्यातून पाऊणे तीन लाख रुपये गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला न्यायाधीशाने फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवर लिंक शोधून रिचार्ज करण्याचा प्रयत्न केले असता सायबर फ्रॉडची ही घटना घडली. या प्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सत्र न्यायालयातील एका महिला न्यायाधीशाने 14 मे रोजी दुपारी चार वाजता स्वतःचे चारचाकी वाहनाचे फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी गुगलवरील लिंक सर्च करुन त्यावर आपले बॅंक खात्याचे डिटेल टाकले. त्यांचे फास्ट टॅग रिचार्ज झाले. त्यानंतर त्यांनी आपले बॅंक खाते नेटबॅंकिंगच्या माध्यमातून तपासले असता त्या बॅंक खात्यातून 2 लाख 75 हजार 399 रुपये एका अज्ञात खात्यात वळते झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बॅंकेच्या कस्टमर केअरला फोनकरुन माहिती दिली. तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 411, 420 आणि आयटी ऍक्टच्या कलम 66 (सी ) आणि 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सायबर सेलच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे.