पिंपरी (प्रतिनिधी) – निवडणूक सर्वेक्षणाच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर लिंक्सचा पूर आला आहे. मात्र याचाच गैरफायदा घेत सायबर क्रिमिनल आपले बॅंक खाते रिकामे करू शकतात. त्यामुळे कोणतीही लिंक ओपन किंवा ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी खात्री करुन घ्यावी. एखादी लिंक किंवा ॲप ओपन करताना काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यावर इच्छुकांनी आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याला जनाधार किती आहे, हे जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार धडपडत असतात. याचाच फायदा घेत काही जणांनी प्रभाग निहाय तसेच शहर स्तरावरील सर्वेक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लिंक पाठविली जात आहे.
अशाच प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून एखाद्या बक्षिसाचे किंवा सर्व्हेक्षणाचे आमिष दाखवून किंवा तुमचे खाते बंद होणार असल्याचे सांगून लिंक पाठविली जाण्याची शक्यता आहे. ही लिंक ओपन करताच आपला मोबाइल हॅंग होऊन त्याचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जातो. जर तुमचा हा मोबाइल बॅंक खात्याशी संलग्न असेल तर तुमचे बॅंक खाते अवघ्या काही मिनिटांमध्ये सायबर गुन्हेगार रिकामे करू शकतात.
अनेकांच्या मोबाइलमध्ये आपल्या कुटुंबाचे तसेच खासगी फोटोही असतात. सायबर गुन्हेगार अशा फोटोंचे मॉर्फिंग करून त्याचा गैरवापर करुन पैशाची मागणी करतात. असे प्रकार यापूर्वी शहरात घडले आहेत. त्यामुळे कोणतीही अनोळखी लिंक किंवा ॲप डाऊनलोड करू नका, असे आवाहन पिंपरी चिंचवडच्या सायबर क्राइम विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी केले आहे.