अमेरिकन नागरिकांची करत होते लूट : दोघांना केले जेरबंद
पुणे – बनावट कॉलसेंटरद्वारे सामाजिक सुरक्षा विभागातून बोलत असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाइल, 10 संगणक हार्ड डिस्क, 3 राऊटर, 8 हेडफोन, 1 एक पेनड्राइव्ह असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
आकीब अल्ताफ शेख (वय 27, रा. कोंढवा) आणि सारीम अमान शेख (वय 29, रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सायबर पोलिसांना कॅम्प भागात एक बोगस कॉलसेंटर चालवले जात असून त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कॅम्पमधील किंगस्टन मीडिया, तिसरा मजला प्लेस ऑफ वर्कशीप बिल्डिंग याठिकाणी छापा टाकून आकीब आणि सारीमला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आर्थिक व सायबर गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, अस्लम अत्तार, योगेश वाव्हळ, संतोष जाधव, प्रसाद पोतदार, ज्योती दिवाने यांच्या पथकाने केली.
असे कार्यरत होते बनावट कॉल सेंटर
अमेरिकन नागरिकांना 200 ते 500 डॉलरचे वॉलमार्ट, गिफ्टकार्ड, टारगेट गिफ्टकार्ड, बेस्टबाय गिफ्टकार्ड खरेदी करण्यास सांगितले जात. त्यानंतर त्या कार्डचे पैशांत रूपांतर करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी विमानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.