सायबर हल्ला : कॉसमॉसला मिळणार हॉंगकॉंग बॅंकेत वर्ग झालेले 10 कोटी

पुणे – कॉसमॉस बॅंकेला स्विफ्ट व्यवहाराव्दारे हॉंगकॉंमधील हेनसेंग बॅंकेत गेलेल्या 13 कोटी 92 लाख रुपयांपैकी दहा कोटी रुपये मिळवण्यात यश आले आहे. हे पैसे हेनसेंग बॅंकेकडून कॉसमॉस बॅंकेला वर्ग होणार आहेत. सायबर पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.

यासंदर्भात सविस्तर असे की, 11 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीमध्ये कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीचवर (सर्व्हर) मालवेअर हल्ला चढवून सायबर गुन्हेगारांनी 14 हजार 849 व्यवहाराद्वारे 80 कोटी 50 लाख आणि स्विफ्ट व्यवहाराद्वारे हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेमध्ये 13 कोटी 92 लाख रुपये असे एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयाच्या एटीएम स्वीचवरील सायबरहल्ला प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने आजवर 15 जणांना अटक केली आहे.

सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने एनपीसीआय, व्हिजा व बॅंकेकडून माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्‍लेषण केले. त्यावरुन मुंबई, कोल्हापुर, अजमेर व इंदौर या शहरांमधून पैसे काढल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, कोल्हापुर, अजमेर व इंदौर येथील टोळ्यांमधील 13 जणांना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असताना कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणाच्यावेळी इंदौरमधील एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांची दोन पथके तयार करुन ती मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आली. त्यामध्ये ठाण्यातील भिवंडी येथे असलेल्या बेग व शेख या दोघांना नुकतेच ताब्यात घेण्यात आले होते.आरोपींनी इंदौरमधील एटीएममधून 53 लाख 72 हजार रुपयांची रक्कम काढली होती.

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

परदेशातील आरोपींचा मात्र थांगपत्ता नाही
सायबर पोलिसांनी आजवर अटक केलेले 15 जण भारतातील आहे. मुख्य आरोपी व इतर सहभागी मात्र परदेशातील आहेत. हे पैसे सुमारे तीस देशातून काढण्यात आले आहे. यापैकी अमेरिका, रशिया, फ्रांन्स आणी जर्मन अशा देशांनी तपासाला सहकार्य करण्याची भुमिका घेतली आहे. तर इतर देशांशीही पत्रव्यवहार झाला असून त्यांच्याकडून अद्याप अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.

…अशी आहे स्फ्टि प्रणाली 
कॉसमॉस बॅंकेचे 13 कोटी 92 लाख रुपये स्विफ्ट प्रणालिव्दारे हॉंगकॉंग येथील बॅंकेत गेले होते. परदेशातील बॅंकांशी आर्थिक व्यवहार सुरक्षित व्हावा यासाठी स्विफ्ट ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. एका देशातील बॅंकेतून दुसऱ्या देशातील बॅंकेत पैसे हस्तांतरीत करण्यासाठी स्विफ्टव्दारे संबंधीत खात्याची खातरजमा करुन आर्थिक व्यवहारांना मान्यता दिली जात असते. त्यानंतर बॅंका पैशाची देवाण घेवाण करतात.

कॉसमॉस बॅंकेला हॉंगकॉंग येथील बॅंकेकडून दहा कोटी रुपये मिळणार आहेत. याची प्रक्रिया दोन्ही बॅंकामध्ये सुरु आहे. यासंदर्भात सायबर पोलिसही बॅंकेच्या संपर्कात आहे.

-संभाजी कदम (उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)