लंडन – लॉर्डस मैदानाने 1983 मध्ये क्रिकेट क्षेत्रास नवा विश्वविजेता दिला होता. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत सनसनाटी विजेतेपद मिळविले होते. आज पुन्हा येथे नवा विश्वविजेता संघ दिसणार आहे. आजपर्यंत अजिंक्यपदाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. दरम्यान, साखळी सामन्यात इंग्लंडने आमचा पराभव केला होता. आज त्या पराभवाची परतफेड करीन असं न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात खेळलेल्या सहा खेळाडूंचा यंदाच्या संघात समावेश आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत इंग्लंड हा त्यांच्यासाठी सोपा प्रतिस्पर्धी आहे. जरी साखळी लढतीत त्यांना इंग्लंडकडून हार मानावी लागली असली तरी भारतावरील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
“साखळी सामन्यात आम्हाला जरी इंग्लंडने सहज हरविले असले तरी हा पराभव आमच्यासाठी इतिहासजमा झाला आहे. या पराभवाची परतफेड करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. भारतावरील विजयामुळे आमचा उत्साह वाढला आहे. अगोदरच्या सामन्यांमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आज होणार नाही.” -केन विल्यमसन, न्यूझीलंड कर्णधार