#CWC2019 : लॉर्डस्‌वर आज इतिहास घडणार

#ENGvNZ : विश्‍वविजेत्याबाबत कमालीची उत्कंठा

स्थळ- लॉर्डस्‌, लंडन
वेळ-दु. 3 वा.

लंडन – लॉर्डस मैदानाने 1983 मध्ये क्रिकेट क्षेत्रास नवा विश्‍वविजेता दिला होता. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवत सनसनाटी विजेतेपद मिळविले होते. आज पुन्हा येथे नवा विश्‍वविजेता संघ दिसणार आहे. आजपर्यंत अजिंक्‍यपदाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये विश्‍वविजेता होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नैपुण्याचा अभाव आहे असे नेहमी म्हटले जाते. त्यांच्यासाठी असलेला कलंक पुसण्याची संधी इऑन मॉर्गन याच्या नेतृत्वाखालील उतरलेला इंग्लंडचा संघ आज कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.

उपांत्य फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. तसेच मायदेशात खेळतानाचा फायदा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. साखळी लढतीत त्यांनी न्यूझीलंडला सहज हरविले होते. त्याचाही लाभ त्यांना मिळणार आहे. तीन वेळा विश्‍वचषक स्पर्धेत उपविजेतेपद त्यांनी मिळविले असल्यामुळे अंतिम लढतीसाठी कसे नियोजन करावे लागते याचाही अनुभव त्यांना आहे. फक्त या सामन्याचे ते कितपत दडपण घेतात यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

न्यूझीलंडने 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात खेळलेल्या सहा खेळाडूंचा यंदाच्या संघात समावेश आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत इंग्लंड हा त्यांच्यासाठी सोपा प्रतिस्पर्धी आहे. जरी साखळी लढतीत त्यांना इंग्लंडकडून हार मानावी लागली असली तरी भारतावरील विजयामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. या सामन्यात त्यांनी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समाधानकारक कामगिरी केली होती. आजही त्याच्या पुनरावृत्तीसाठी ते उत्सुक आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल , ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.