पिथोरगढ (उत्तराखंड): उत्तराखंडमधील नंदा देवी शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या 8 जणांच्या पथकामधील 5 गिर्यारोहकांचे मृतदेह हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून दिसले आहेत. ब्रिटन, अमेरिका अणि ऑस्ट्रेलियतील गिर्यारोहकांचा समावेश असलेले हे पथक 25 मे पासून बेपत्ता होते.
रविवारी याच भागात अडकून पडलेल्या ब्रिटनच्या चार गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या 8 गिर्यारोहकांच्या शोधासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने शोधमोहिम सुरू होती. आज हे मृतदेह नंदा देवी पूर्वेकडील एका कपारीजवळ आढळून आले आहेत, असे पिथोरगढचे जिल्हा दंडाधिकारी व्ही.के. जोगदांडे यांनी सांगितले. नंदा देवी शिखराजवळील डोंगरकडा चढून जाण्याचा प्रयत्नात हिमकडा कोसळून या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
या गिर्यारोहकांच्य सुटकेसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह, “इंडियन माऊंटनेअरींग फौंडेशन’चे तज्ञ लासपा आणि बुदगियार येथील कॅम्पमध्ये तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्याच मदतीने बचाव कार्य केले जाईल. याबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यात आला असून पुढील आदेशांनुसार बचावकार्य केले जाईल, असेही न्या. जोगदांडे यांनी सांगितले.