“आवळा देऊन, कोवळा काढला’ : सातवा वेतन आयोगासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात कपात

मुंबई : सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी त्यासाठी सरकारने आवळा देऊन कोवळा काढला आहे. आयोगामुळे मुळ वेतनात वाढ होणार असल्याने तिजोरीवर पडणारा आर्थिक भार पाहून सरकारने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात सहा ते दोन टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहाव्या वेतन आयोगात शहरी भागात अ, ब आणि क आणि ग्रामीण (अवर्गीकृत) अशी वर्गवारी करून सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात होता. सातव्या वेतन आयोगात एक्‍स, वाय व झेड असे वर्गीकरण करून घरभाडे भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. आधीच्या आयोगाप्रमाणे 30, 20 व 10 टक्के भत्ता मिळत होता. त्याऐवजी आता 24, 16 व 8 टक्के असे घरभाडे भत्त्याचे दर ठरविण्यात आले आहेत. महागाई भत्त्यांचा दर ज्यावेळी 25 टक्‍क्‍यांच्यावर जाईल त्यावेळी घरभाडे भत्त्याच्या दरात वाढ करण्यात येणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना 30 जानेवारीला काढण्यात आली. त्यापाठोपाठ घरभाडे भत्त्यांसदर्भात सुधारीत आदेश वित्त विभागाने काढले आहेत. यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतन आयोगामुळे एकूण वेतनात भरघोस वाढ मिळणार असली तरी घरभाडे भत्त्यात कपात करण्यात आल्याने आणि वाहतूक भत्ता जुन्याच दराने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.