करंदीत झाडे तोडून वनविभागाच्या जागेत कब्जा?

पर्यावरण संघटना आंदोलन छेडणार : संबंधित कंपनी व्यवस्थापनाने आरोप फेटाळले

शिक्रापूर – करंदी (ता. शिरूर) येथील दोन खासगी कंपन्यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करीत बेकायदेशीरपणे अनेक झाडांची कत्तल करून स्वतःच्या कंपनीसाठी रस्ता व पार्किंग केला आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

करंदी येथील संकल्प इंजिनिअरिंग व कीर्तनलाल प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी वनविभागाच्या जागेतील विविध झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करून शासकीय जागेमध्ये रस्ता बनविला आहे. कंपनीच्या वाहनांसाठी पार्किंग सुरू केले आहे. याबाबत पर्यावरण मित्र संघटनेचे भारत संघटक सागर वर्पे यांनी तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने याकडे लक्ष देत झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर शिरूर वनपरिक्षेत्र व तहसील कार्यालयसमोर उपोषणास बसण्याचा इशारा वर्पे यांनी दिला आहे.

आमच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांची परवानगी आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम
केले नाही
– श्री. शर्मा, संकल्प इंजिनिअरिंग व कीर्तनलाल कंपनीचे एच. आर. व्यवस्थापक


करंदी येथील वनविभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून रस्ता बनविला जात आहे. तेथील काम थांबविण्याबाबतचे आदेश मला शिरूर तहसीलदार कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी दिले. त्यामुळे मी या ठिकाणी जाऊन तेथे सुरू असलेले काम थांबविलेले असून तहसीलदार यांच्या परवानगीने काय आहे, ते पाहा, असे सांगितले आहे.
– संदीप शिंदे, तलाठी


करंदी येथील वनविभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण व झाडे तोडल्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली असून सदर ठिकाणची पाहणी करून संबंधित व्यक्तींवर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे.
-मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)