‘मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे पाणी तोडून टाका…त्यांना विधानसभेत बिनाआंघोळीचे येवू दे’

 अजितदादा पवार विधानसभेत कडाडले

मुंबई: मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या बंगल्याच्या पाण्याच्या थकलेल्या बीलांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आज विधानसभेत कडाडले. महापालिकेची पाणीपट्टी भरली नसल्याने ज्या मंत्र्यांचे नाव “डिफॉल्टर’ यादीत आहेत अशा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका…त्यांना बिना आंघोळीचे विधानसभेत येऊ द्या…त्याशिवाय त्यांना कळणार नाही, अशा शब्दात पवार यांनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “वर्षा’ निवासस्थान तसेच इतर काही मंत्र्यांच्या निवासस्थानांची पाणीपट्टीच मुंबई महापालिकेला भरली न गेल्याने महापालिकेने त्यांना “डिफॉल्टर’ घोषित केल्याचे पडसाद विधानसभेत उमटले. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यावरून अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मुंबईत कोट्यावधी लोक राहतात. त्यांनी जर पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्‍शन तातडीने कापले जाते. त्यांना तातडीने पैसे भरायला सांगितले जाते. अशा नागरिकांना कुणीच वाली नसतो. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील पाण्याच्या मीटरचे पैसे भरले जात नाही. मंत्र्यांचा आदर्श ठेवत जनतेने बील न भरायचे ठरवले तर पालिकेची अवस्था बिकट होईल, अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारची दयनीय अवस्था झाली आहे का? पैसे वेळेवर भरले का जात नाही. मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते? अधिकारी झोपा काढतात काय, असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.


बिले थकवली यात तथ्य नाही – मुख्यमंत्री

बिले भरली गेली नाहीत या आरोपात कोणतेही तथ्य नाही. बिले रेग्युलर भरली जात होती. भरली गेलेली बिले परत आली. त्यामुळे महापालिकेला पत्र लिहून ते निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तेव्हा पुन्हा रक्कम दुरूस्ती करून नवीन बिले पाठविण्यात आली. सरकारी कार्यपदधतीनुसार यात महिना दीड महिना गेला. आमच्याकडे उपसचिव, सचिव आदी चार जणांच्या सह्या होउन ते पत्र गेले. महापालिकेत सुद्धा तेच झाले. या मधल्या काळातील माहिती सिलेक्‍टीव्हली माहिती अधिकारात काढली गेली. माध्यमांनी देखील तशा बातम्या दाखविल्या. बिले थकविली यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करू दयात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि सभागृहात एकच हशा उसळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)