अकरावी प्रवेश प्रक्रिया : अर्ज केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ घसरला आहे. दहावीच्या निकालात घट झाल्यामुळे यंदा प्रवेशाचा कट ऑफ घटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे हे निश्चित झाले आहे.
राज्यासह पुणे विभागात अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.12) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यंदा 296 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी 63 हजार 566 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 48 हजार 701 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतच प्रवेश मिळाला आहे.
अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने शनिवारी (दि.13) महाविद्यालयांचे कट ऑफ जाहीर केले आहे. गेल्या वर्षी कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांच्या प्रवेशाचा कट ऑफ 95 टक्क्यांच्या पुढेच होता. यंदा मात्र त्यात खूप घट झाली आहे.
नामांकित महाविद्यालयांचाही कट ऑफ घसरला असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. बेस्ट ऑफ फाईव्ह प्रमाणेच विद्यार्थ्यांचे एकूण गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात आले आहेत. मार्च 2019 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत भाषा व समाजशास्त्र या विषयांचे अंतर्गत गुण देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. यामुळे दहावीच्या निकालाचा टक्का घटलाचे चित्र आढळून आले आहे.
गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के एवढा लागला होता. यंदा हा निकाल 77.10 टक्के एवढा लागला आहे. निकालात 12.31 टक्क्यांने घट झाली आहे. पुणे विभागाचा निकाला गेल्या वर्षी 92.08 टक्के लागला होता. यंदा तो 82.48 टक्के इतका लागला आहे. यात 9.6 टक्क्यांने घट झाली आहे. या घटलेल्या निकालामुळेच प्रवेशाचा कट ऑफही घसरला आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी व कट ऑफची यादी पहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात धाव घेण्यास सुुरुवात केली आहे. प्रवेशाची कागदपत्रे सादर करून प्रवेश घेण्याची प्रक्रिया महाविद्यालयात सुरू झाली आहे.
महाविद्यालय -कला शाखा कट ऑफ गुण (मराठी माध्यम)
फर्गसन – 409, एस.पी. -342, नौरोजी वाडीया -295, नारायणराव सणस – 295, कर्मवीर भाऊराव पाटील -288, मॉर्डन – 269, आबासाहेब गरवारे -267, एस.एन.डी.टी. – 249, कॅम्प एज्युकेशन सोसायटी -247, श्री भैरवनाथ -236.
महाविद्यालय – कला शाखा कट ऑफ गुण (इंग्रजी माध्यम)
फर्गसन – 478, सिम्बॉयसीस -469, एस.पी.-462, मॉडर्न -447, डॉ. श्यामराव कलमाडी -434, नौरोजी वाडीया -434, सेंट मिरा -400, पी.जोग – 383, पूना -337, अबेदा इनामदार -323.
महाविद्यालय-वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) कट ऑफ गुण
मॉडर्न -384, श्री संत तुकाराम -361, साधना -349, भारतीय जैन संघ -334, अण्णासाहेब मगर -327, मराठवाडा मित्रमंडळ -319, नेस वाडिया -317, लोणकर -311, कॅम्प एज्युकेशन सोसायटी-305, विश्वकर्मा -304.
महाविद्यालय – वाणिज्य शाखा कट ऑफ (इंग्रजी माध्यम)
बी.एम.सी.सी. – 474, एमईएस गरवारे -456, सिम्बॉयसीस -450, एस.पी.-443, एमआयटी-441, मॉडर्न -430, विमलाबाई गरवारे -426, नेस वाडिया -414, नूमवि -407, एस.एन.डी.टी.-396.
महाविद्यालय-विज्ञान शाखा कट ऑफ गुण
फर्गसन -480, आपटे – 478, पी.जोग.-471, सिटी प्राईड – 458, एस.पी.-456, रसिकलाल धारिवाल -455, मॉडर्न -453, राजीव गांधी ऍकॅडमी ऑफ ई-लर्निंग -452, आबासाहेब गरवारे -448, मराठवाडा मित्र मंडळ -446.