घर बूक केलेल्यांना प्रकल्प पूर्ण करण्याची महारेराची परवानगी
पुणे – पुण्यातील तळेगाव येथील डीएसकेंचा पूर्णत्वास येऊन रखडलेला प्रकल्प आता या प्रकल्पात घर खरेदी करणारे ग्राहक पूर्ण करणार आहेत. तशी परवानगी महारेराने या ग्राहकांना दिली आहे.
तळेगाव येथील “सदाफुली’ नावाचा हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झालेला आहे. उरलेला प्रकल्प ही घरे विकत घेतलेले, बुक केलेले ग्राहक पूर्ण करणार आहेत. ग्राहकांना मदत करण्यासाठी या प्रकल्पाला वित्तपुरवठा करणारी कंपनी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स आणि इतर दोन सदस्यांची महारेराने नियुक्ती केली आहे. सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीमध्ये मूळ प्रवर्तक आपले हक्क इतरांना देतात. मात्र, डीएसकेचे प्रकरण अधिक बिघडल्यामुळे 181 जणांच्या घर नोंदणीवर परिणाम झाला होता. आता महारेराने या प्रकल्पाची नोंदणी रद्द केली आहे.
असोसिएशन ऑफ ऍलॉटीज् (एओए)ना हा प्रकल्प पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. महारेराने नियुक्त केलेली तीन सदस्यांची समिती “एओए’ला मदत करेल. “एओए’ आणि हे तीन सदस्य हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ब्ल्यू प्रिंट महारेराकडे फेब्रुवारीपर्यंत सादर करतील. या प्रकल्पात दोन टप्प्यात 279 सदनिकांचे काम होणार होते. यातील 161 सदनिका अगोदरच विकल्या गेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दोन टॉवरमध्ये 184 सदनिका बांधल्या जाणार होत्या. त्यातील शंभर अगोदरच विकल्या गेल्या आहेत किंवा बुक झालेल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये 95 सदनिका बांधल्या जाणार होत्या. त्यातील 61 अगोदरच विकल्या गेल्या आहेत किंवा बूक झाल्या आहेत. महारेराने कंपनीच्या प्रवर्तकांनी या प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र बॅंकेत उघडलेले खाते पुढील आदेशापर्यंत गोठविले आहेत. दरम्यान, डीएसके समुहातील दुसऱ्या एखाद्या गुंतवणूकदाराने “एनसीएलटी’मध्ये दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता गृहीत धरून “एओए’ला आणि टाटा कॅपिटल हाऊसिंगला “एनसीएलट’मध्ये कॅव्हेट दाखल करण्यास महारेराने सांगितले आहे.