ग्राहकांचे हितरक्षण गरजेचे (भाग-१)

देशातील बाजारपेठ वाढत असताना कोणत्याही फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हिताची जोपासना करण्याचे आव्हानही समोर उभे आहे. भेसळ, किमान निकष न पाळता होत असलेली वस्तूंची विक्री, अधिक किमतीची वसुली, कमी वजनाच्या वस्तूंची विक्री अशा अनेक प्रकारांनी ग्राहकांचे शोषण होताना दिसते आहे. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेले सध्याचे कायदे तोकडे पडताना दिसत आहेत. वस्तूंच्या गुणवत्तेसंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियामक यंत्रणा निश्‍चित केली जाणे गरजेचे आहे.

बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप या जगप्रसिद्ध कन्सल्टन्सी कंपनीच्या 2019 च्या अहवालात म्हटले आहे की, भारताची ग्राहक बाजारपेठ ही जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. 2018 मध्ये भारताचा ग्राहक बाजार 110 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. भारताचा ग्राहक बाजार 2028 पर्यंत तीन पटींनी वाढून 335 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. देशाची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण, वाढता मध्यमवर्ग तसेच इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढत असलेला वापर ही बाजारपेठेत होणाऱ्या वाढीची कारणे सांगितली जातात. मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या या बाजारपेठेची उपभोग आणि समृद्धीची जी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या आपापली धोरणे ठरवीत आहेत. भारतातील ग्राहक बाजारपेठेची ताकद जगाने ओळखली असून, कालपर्यंत उपेक्षित राहिलेला देश आज देशातील अनेक कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ग्राहकांच्या ताकदीवर भारत आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असतानाच भारत आपल्या ग्राहकशक्तीने जगाला आकर्षित करून घेत आहे. सातत्याने नवनवीन उंची गाठणाऱ्या भारतीय बाजारपेठेचे महत्त्व ओळखून आंतरराष्ट्रीय व्यासपीठे आणि जागतिक संघटनांनाही भारताचे महत्त्व दिसत आहे.

ग्राहकांचे हितरक्षण गरजेचे (भाग-२)

निश्‍चितच भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा संबंध बाजारपेठ वेगाने वाढण्याशी आहे. भारताची सध्याची लोकसंख्या 134 कोटी आहे आणि चीनची लोकसंख्या 141 कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक लोकसंख्येविषयी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की सन 2024 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होईल. जगातील अन्य सर्व देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या सर्वांत अधिक असेल. सर्वाधिक लोकसंख्येमुळे भारताचा ग्राहक बाजारही जगात सर्वांत मोठा असेल. त्याचप्रमाणे शहरांचा होत असलेला गतिमान विकास हेही बाजारपेठ वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. भारताची बाजारपेठ विस्तारित होण्यात मध्यमवर्गाचा मोठा वाटा आहे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. शहरात राहणारा मध्यमवर्ग उद्योग-व्यवसाय, सेवा तसेच व्यावसायिक पात्रतांमुळे केवळ आपली कमाई वाढवत आहे, असे नव्हे तर आपल्या क्रयशक्तीमुळे ग्राहक बाजारपेठेची चमकही वाढवीत आहे. पीडब्ल्यूसी या विश्‍वविख्यात कन्सल्टन्सी फर्मने नुकतेच असे म्हटले आहे की, फ्रान्सला मागे टाकून भारत क्रयशक्तीच्या आधारावर जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल.

– अॅड. प्रदीप उमाप, कायदे अभ्यासक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.