आज घटस्थापना : आवक वाढली : दर्जेदार फुलांना ग्राहकांची जास्त मागणी
पुणे – शारदीय नवरात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सवासाठी मार्केट यार्डातील फूल विभागात फुलांची आवक वाढली आहे. कमी दर्जेदार फुले बाजारात दाखल होत असून, दर्जेदार फुलांना जास्त मागणी आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर जिल्ह्यासह सातारा, सोलापूर भागात पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम फुलांच्या दर्जावर झाला आहे.
सध्या मार्केटयार्डात पुणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद भागातून फलांची आवक होत आहे. पितृपंधरवड्यामुळे फूलबाजारात होणारी उलाढाल थंडावली होती. शनिवारी घाऊक बाजारात झेंडूला प्रतिकिलो 5 ते 15 रुपये भाव मिळाला. हे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. नवरात्रोत्सवात दसऱ्याला झेंडूला मोठी मागणी असते. पुढील दोन ते तीन दिवस झेंडूचे भाव वाढतील, अशी शक्यता आहे असे फूलबाजारातील प्रमुख विक्रेते सागर भोसले यांनी वर्तविली आहे. नवरात्रोत्सवात हार विक्रेते तसेच तोरण विक्रेत्यांकडून फुलांना मोठी मागणी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू- 5 ते 15 रुपये, गुलछडी-200 रुपये, बिजली-30 ते 60 रुपये, शेवंती-30 ते 60 रुपये, गुलाब (गड्डीचा भाव)- 10 ते 30 रुपये. दरम्यान, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात घटस्थापनेसाठी लागणारे पूजासाहित्य तसेच फुलांच्या खरेदीसाठी शनिवारी गर्दी झाली होती.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात शुक्रवारी 55 हजार 709 किलो एवढी झेंडूची आवक झाली. गुलछडी 6 हजार 217 किलो, साधा गुलाब 432 गड्डी, ग्लॅडीएटर 6 हजार 992 गड्डी, डच गुलाब 3 हजार 625 गड्डी, जरबेरा 3हजार 121गड्डी, कार्नेशियन 854 गड्डी अशी आवक बाजारात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजाराचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.