पिंपरी – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात हिवाळा ऋतूची चाहुल लागली आहे. हिवाळा सुरू होताच त्या ऋतूतील फळेही बाजारात दाखल होवू लागली आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजारात सिताफळ, हनुमानफळ, स्ट्रॉबेरी आदी फळांना शहरवासियांकडून अधिक मागणी होत आहे.
थंडीची चाहुल लागताच दरवर्षी बाजारात सिताफळ, स्ट्रॉबेरी मोठ्या संख्येने दाखल होते. मागील काही दिवसांपासून वातावरणात गारठा निर्माण झाल्यानंतर शहरात सिताफळाची मोठ्या प्रमाणात आवक होवू लागली आहे.
सध्या बाजारात गावरान सिताफळ 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर आकाराने मोठे असलेले गोल्डन सिताफळ 110 ते 120 रुपये प्रतिकीलो दराने विक्री होत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारात मराठवाड्यासह इतर ठिकाणची सिताफळे विक्रीस आली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सिताफळाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. याबरोबरच सिताफळापेक्षा काहीसे चवीला गोड असणाऱ्या हनुमानफळही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हनुमान फळाची 160 ते 170 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. याबरोबरच लालसर चवीला गोड व आंबुस असलेली स्ट्रॉबेरीही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. बाजारपेठेत मागील काही दिवसापासून महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे. स्ट्रॉबेरीचे एक पॉकीट 50 ते 60 रुपये दराने विक्री होत आहे. सध्या सफरचंदाला 70 ते 80 रुपये प्रतिकीलो असा दर मिळत आहे.