पुणे मधील अग्रमानांकित मॉडर्न एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर इंजिनीअरिंग या विभागाने दाखल केलेल्या पदविका अभ्यासक्रमांना देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन [National Board of Accreditation-(NBA)] कडून सर्वोच्च मानांकन मिळाले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य श्री. विनायक रा. राव यांनी दिली.
त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले की, मेकॅनिकल व सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांसाठी २०१९ ते २०२५ पर्यत म्हणजेच एकूण सहा वर्षांसाठी व इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर इंजीनियरिंग या अभ्यासक्रमांसाठी २०१९ ते २०२२ पर्यंत म्हणजेच एकूण तीन वर्षांसाठी एन.बी.ए. मानांकन प्राप्त झालेले आहे. प्राचार्यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.
तसेच, इन्स्टिट्यूटचे एन.बी.ए. समन्वयक व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. अशोक चांडक यांनी या मानांकनापासून मिळणाऱ्या फायद्याबद्दल माहिती देताना सांगितले की, एन.बी.ए. ही तंत्र शिक्षण संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून १९८९ मध्ये वॉशिंग्टन अकॉर्डनुसार झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रमाणित करारांची सदस्य आहे. म्हणून हे मानांकन मिळालेल्या संस्थेतील विद्यार्थी हे सदस्य देशातील मानांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तोडीचे संबोधले जातात. या मानांकनामुळे संस्थेच्या अभ्यासक्रमांना एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने महाविद्यालयास शासनाकडून विविध प्रकारचा निधी मिळण्यास मदत होईल. तसेच त्यांच्याकडून असे देखील सांगण्यात आले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रशिक्षणाचे सर्वोच्च मानांकन मिळविणे सोपे काम नाही. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सदरची मानांकने नसलेल्या संस्थेस शासकीय तसेच इतर सवलती मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.
हे मानांकन मिळविण्याकरिता कुसरो वाडिया तंत्रनिकेतन संस्थेने प्रमाणित पद्धतीचे सर्व कागदपत्रे सादर केल्याने व त्यातील प्राथमिक निकषांवर संस्थेची गुणवत्ता सिद्ध झाल्यावर एन.बी.ए. कडून एकूण सहा तज्ज्ञांच्या समितीने संस्थेस दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१९ दरम्यान भेट देऊन सादर केलेल्या माहितीची शहानिशा व वस्तुस्थिती पाहून आपला अहवाल एन.बी.ए.कडे पाठविला. समितीने या संस्थेच्या विविध निकषांवर आधारित नेमून दिलेल्या ९ टप्प्यात मूल्यमापन करून तपासणी केली असता मुख्यत्वे संस्थेची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, शैक्षणिक व पायाभूत सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आत्तापर्यंत महाविद्यालयांने केलेली प्रगती याची देखील दखल घेतली.
पाचही पदविका अभ्यासक्रमांना एन.बी.ए. कडून मिळालेल्या मानांकनाबद्दल सर्व विभाग प्रमुखांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त डॉ. अभय हाके, डॉ. अशोक चांडक व डॉ. मनोहर सानप तसेच आजी-माजी विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या मूल्यांकनात उत्कृष्टस्थानी असलेले, उत्तम शैक्षणिक निकाल आणि याच्या पंक्तीला आता एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गात देखील समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या मानांकनाचा फायदा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका प्राप्तीनंतर करिअर करताना होणार आहे.
सर्व कर्मचार्यांच्या भरीव कामगिरीमुळे राज्यात नावलौकिक
अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, परंपरा तसेच त्यांना रोजगाराभिमुख बनविणे हेच आमचे वैशिष्ट्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच, संस्थेतील डॉ. अशोक चांडक, प्रा. ए. एस. शेलार, प्रा. सौ. के. जी. मानकर, प्रा. यु. एन. कांबळे, प्रा. ए. ए. जांभळे, डॉ. डी. व्ही. पाटील, प्रा. ए. वाय. बोरकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाल्यामुळे कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला राज्यात तसेच देशात नावलौकिक प्राप्त झालेला आहे. – डॉ. अभय हाके, विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे.
– श्रेया अंबेटी,
कॉलेज रिपोर्टर,
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी