बो लेग्ज नडगीच्या हाडांची वक्रता

पायाच्या दुखण्यापाठीमागे असणाऱ्या विविध कारणांपैकी पायाची बिघडलेली नैसर्गिक ठेवण हा विचार महत्त्वाचा ठरतो. उतार वयात पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन अनेक जण डॉक्‍टरांकडे येतात. आयुष्यभर सहन केलेल्या कष्टदायी कामांमुळे उतारवयात शरीराची, सांध्याची झीज होणे अपेक्षित आहे, अशी त्यांची विचारधारा असते. त्यांच्या पायांना काही प्रमाणात बाक येण्यास सुरुवात झाली आहे. ठराविक औषधांमुळे दुखण्याचा जोर कमी होतो. मात्र, योग्य प्रकारच्या व्यायामाची गरज आणि जागरूकता महत्त्वाची असते.

साधारणपणे वयाच्या एक ते दीड वर्षांपर्यंत लहान मुले व्यवस्थित चालायला लागतात. दोन पायांवर तोल सांभाळण्याची कला त्यांना या वयात प्राप्त होते. पुढे वयाच्या पाच ते सहा वर्षांपर्यंत पायांची ठेवण तयार होते. याचदरम्यान मुलांच्या पायांच्या ठेवणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उभे राहिल्यानंतर टाचा एकमेकांना चिकटलेल्या असतात आणि गुडघे लांब असतात. मांडीच्या आणि नडगीच्या हाडाला बाहेरच्या बाजूने बाक तयार झालेला असतो.
थोडक्‍यात, पाय काहीसे धनुष्यासारखे दिसू लागतात. काही बालकांमध्ये हे जन्मजात असू शकते. साधारणपणे तिसऱ्या वर्षांपर्यंत हा बाक कमी होऊन पायाला योग्य ठेवण मिळते. पुढे वाढत्या वयातही पायाची ठेवण निरनिराळ्या कारणांनी बदलू शकते. काही वेळा अपघात, संधिवात, कमरेचे त्रास अशा तक्रारींमुळे देखील उद्‌भवतात.

अशा प्रकारच्या पायाची ठेवण वैद्यकीय भाषेत “बो लेग्ज’ म्हणजेच “जेनु व्हारम’ या नावाने संबोधली जाते. अशा प्रकारची ठेवण असणाऱ्या व्यक्‍तींना दोन्ही पाय जुळवून उभे राहण्यास सांगितल्यावर त्यांच्या गुडघ्यामध्ये अंतर असलेले आढळते. पायाला आलेला बाक काही प्रमाणात समजून येतो. अशा व्यक्‍तींचा गुरुत्वमध्य विस्कळीत झाल्यामुळे शरीराचे वजन पेलण्यासाठी त्यांना त्यांच्या दोन्ही पायामध्ये अंतर ठेवावे लागते. पायाचे चवडे बाहेरच्या बाजूस असल्याचे जाणवते. शरीराचा बराचसा भार पावलाच्या बाहेरच्या बाजूवर असतो. अशा प्रकारची पावले असणाऱ्या व्यक्‍तींची पादत्राणे अर्थात चप्पल किंवा बूट बाहेरच्या बाजूने जास्त प्रमाणात झिजलेले दिसून येतात.

गुरुत्वमध्य विस्कळीत झालेल्या अशा व्यक्‍तींमध्ये प्रामुख्याने गुडघेदुखी, कंबरदुखी, पायाच्या हालचाली सुरळीत न होणे, अशा तक्रारी दिसून येतात. पर्यायाने चालताना किंवा पळताना त्रास जाणवतो, चालताना किंवा वावरताना गुडघ्यात कमजोरी जाणवते आणि वाढत्या वयात संधिवाताच्या तक्रारी वाढत जातात. क्वचित प्रसंगी कंबरदुखी किंवा गुडघेदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्‍तींच्या पायाचा बाक हा प्रत्यक्षरीत्या कळून येत नाही. अशा व्यक्‍तींच्या पायाच्या एक्‍स्‌-रे मध्ये असा बाक ठळकपणे दिसून येतो.

त्यासाठी काही तपासण्या करणेही आवश्‍यक ठरते. व्यक्‍तिसापेक्षतेनुसार होमिओपॅथिक औषधे दिल्याने आणि योग्य पाश्‍चर थेरपीनुसार केलेल्या उपचारामुळे हा बाक कमी होण्यास मदत होते. तरीही तक्रारींच्या तीव्रतेनुसार तक्रारींचे निवारण होण्यासाठी सलग काही महिने उपचार घेणे आवश्‍यक आहे. योग्य उपचारांमुळे चालताना होणारा त्रास, कंबरदुखी, गुडघेदुखी या प्रकारच्या तक्रारींवर हळूहळू मात करता येते. पायाचा बाकही सुधारण्यास मदत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.