यशवंतनगर : गेल्या तीन महिन्यांपासून नडशी ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या वादावर अखेर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, रेल्वे प्रशासन व नडशी ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीने पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांना श्री. म्हेत्रे यांनी समजावून सांगितला. त्यामध्ये आधी पर्यायी मार्गाची व्यवस्था नंतरच बोगद्याचे काम सुरू करणे व त्यानुसारच कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या. तसेच ग्रामस्थांनी रेल्वेच्या कामात अडथळा आणू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
तत्पूर्वी रेल्वे गेट क्रमांक ९६ परिसरात पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी मगच भुयारी पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी नडशी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत रेल्वे प्रशासनाकडून आज भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. याबाबत नडशी ग्रामस्थांना माहिती मिळताच आक्रमक ग्रामस्थांनी भुयारी मार्गाचे काम बंद पाडले. पर्यायी रस्त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काम करुन देणार नाही अशी भूमिका घेण्यात आल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाला नमते घेत काम थांबवावे लागले.
यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी ग्रामस्थ आणि रेल्वे प्रशासन यांची चर्चा घडवून आणत मध्यम मार्ग काढत पर्यायी रस्त्याची डागडुजी करून रहदारीसाठी योग्य असा करावा नंतरच बोगद्याचे काम सुरू करा, अशी सूचना केली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या सूचना धुडकावत बोगद्याचे काम सुरूच ठेवल्याने ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनामध्ये वादाच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, रेल्वे प्रशासन व नडशी ग्रामस्थांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत नडशी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत यापुढे बोगद्याच्या कामात अडथळा न आणण्याचा निर्णय घेतला व नवीन भुयारी मार्गासाठी संविधानिक मार्गाने पाठपुरावा करण्याचा ठराव केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
दोन रेल्वे अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चिघळला वाद…
रेल्वे दुहेरीकरण कामाच्या दोन अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तीन महिन्यांपासून रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांच्या मधील वाद ताणला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या अधिकाऱ्यांनी थोडीशी सहकार्याची भूमिका घेतली असती तर हा वाद ताणला गेला नसता. रेल्वे प्रशासनाला नडशी ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेऊन देखील या दोन अधिकाऱ्यांनी नेहमीच ग्रामस्थांच्या विरोधी भूमिका घेत अधिकाराचा धाक दाखवून ग्रामस्थांना त्रास दिला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रेल्वे प्रशासनाकडून नडशीकरांवर अन्याय…
ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला न घेता रेल्वे फाटक बंद करून नडशी ग्रामस्थांच्या माथी धोकादायक भुयारी मार्ग लादला गेला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी नडशी ग्रामस्थांना पोकळ आश्वासने देऊन आपले काम करुन घेतले व नंतर त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. हा भुयारी मार्ग नडशी ग्रामस्थांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. त्यामुळे नडशी ग्रामस्थांवर रेल्वे प्रशासनाकडून अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून नडशी ग्रामस्थांकडून रेल्वेच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही तसेच नवीन बोगद्यासाठी संविधानिक मार्गाने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला असून याकामी प्रशासन आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे.
निवास थोरात (जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नडशी)