गुंतवणूक सैरभैर; शेअर बाजार निर्देशांकांची ऐतिहासिक घसरण
एकाच दिवसात गुंतवणूक मूल्यात 11 लाख कोटींची घट
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूला साथीचा रोग घोषित केले. अमेरिकेसह भारताने परदेशतून येणाऱ्या प्रवांचा व्हिसा रद्द केला. सौदी अरेबिया आणि रशियातील तीव्र मतभेदांमुळे क्रूड उत्पादन वाढून क्रूडचे दर निम्म्याने कोसळले आहेत.
येस बॅंकेतील घडामोडींमुळे भारतीय बॅंकिंग व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. इत्यादी कारणांमुळे जगतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांक गुरुवारी कोसळले. गुरुवारी बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 2 हजार 919 अंकांनी कोसळून 32,778 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 868 अंकांनी कोसळून 9,590 अंकांवर बंद झाला.
या निर्देशांकांच्या कोसळण्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय शेअर बाजाराच्य निऱ्दइतिहासात एकाच दिवसात निर्देशांकांची एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती. देशातील आणि परदेशातील नकारात्मक वातावरणामुळे गुंतवणूक सैरभैर झाल्याचे वातावरण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याचा परिणाम
जगतिक आरोग्य संघटनेने या आगोदर करोना विषाणूला जग पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचे वेळोवेळी म्हटले होते. आता अमेरिका, युरोप, इराणसह अनेक देशातील रुग्णांची संख्या वाढल्यानंतर बऱ्याच देशांनी परदेशी प्रवाशांना देशात येण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात अमेरिकेने प्रवासावर बंदी घातल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार कोसळले. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारवरही झाला. करोना विषाणूमुळे 100 देशात साडे चार हजार लोक मृत्यू पावले आहेत. तर सव्वा लाख लोक बाधित आहेत.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री
जागतिक गुंतवणूक आणि व्यापारावर परिणाम होत असल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार एकतर्फी विक्री करत आहेत. आता जागतिक व्यापार थंडावणार असल्यामुळे हे गुंतवणूकदार अमेरिकन चलन आणि सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारातून या गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यत 20 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
सर्वच क्षेत्रातील शेअर पिछाडीवर
कोणत्याही क्षेत्रात आशावाद राहिलेला नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची तुफान विक्री झाली आहे. बॅंकिंग, धातू, तेल शुद्धीकरण, औषधे इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांचे गुरुवारी झालेल्या विक्रीमुळे आतोनात नुकसान झाले आहे.
रिझर्व बॅंक आणि अर्थ मंत्रालय सक्रीय
गेल्या 15 दिवसांपासून करोना विषाणू आणि बॅंकिंग क्षेत्रातील पेचामुळे शेअर बाजार निर्देशांक बरेच कमी झाले होते. या परिस्थितीकडे सरकारचे बारीक लक्ष असल्याचे अर्थ मंत्रालय आणि रिझर्व बॅंक वेळोवेळी सांगत होते. मात्र गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात एवढी मोठी घट होईल, याचा अंदाज कोणालाही आला नाही.
गुरुवारी होळीमुळे भारतीय शेअर बाजाराचे कामकाज बंद होते. तर जागतिक शेअर बाजारात सोमवारच्या मोठ्या विक्रीनंतर थोडीग्फार सुधारणा झाली होती. आज निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर रिझर्व बॅंक आणखी भांडवल सुलभता उपलब्ध करण्याच्या शक्यतेवर विचार करत असल्याचे सांगण्यात आले.
व्याजदरात 0.40 टक्क्यांपर्यंत कपात शक्य
नकारात्मक वातावरणाचा उद्योगावर परिणाम जास्त होऊ नये याकरता पतधोरण समितीच्या बैठकीची वाट न बघता रिझर्व बॅंक् लवकरच 0.25 ते 0.40 टक्क्यांपर्यंत कपात करू शकते. त्याचबरोबर गेल्या 2 आठवड्यात रुपया कोसळल्यामुळे रुपयाला आधार देण्यासाठी सोमवारी रिझर्व बॅंक आपल्याकडील 2 अब्ज डॉलर विकणार आहे. बॅंकेकडे सध्या 487 अब्ज डॉलरची गंगाजळी असल्यामुळे बॅंकेला ही कार्यवाही सहज शक्य आहे.
शिवाय खासगी बॅंकांवरील ग्राहकांचा विश्वास कायम रहावा, याकरिता राज्य सरकारने खासगी बॅंकांमधील ठेवी काढून घेऊ नयेत, अशी सूचना रिझर्व बॅंकेने केली आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात सरकारच्या दृष्टीने आज दोन सकारात्मक आकडेवारी जाहीर झाल्या. औद्योगिक उत्पादन 6 महिन्यात प्रथमच 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचबरोबर किरकोळ महागाई थोडी कमी होऊन फेब्रुवारी महिन्यात 6.58 टक्क्यांवर आली आहे. क्रूड कोसळल्यामुळे इंधनाचा खर्च कमी होऊन महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
येस बॅंकेचा शेअर कोसळला
रिझर्व बॅंकेने निर्बंध जारी केल्यानंतर येस बॅंकेचा शेअर 80 टक्क्यांपर्यंत कोसळा होता. मात्र नंतर स्टेट बॅंक आणि रिझर्व बॅंक या बॅंकेला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. स्टेट बॅंक येस बॅंकेचे 49 टक्के भागभांडवल विकत घेणार असल्यामुळे गुंतवणूकदारांना धीर येऊन येस बॅंकेच्या शेअरच्या भावात सुधारणा झाली होती. मात्र गुरुवारी एकूणच बॅंकिंग क्षेत्र पिछाडीवर गेल्यानंतर येस बॅंकेचा शेअरही 40 टक्क्यांपर्यंत कोसळला.