काराकस – आर्थिक परिस्थिती आणि गरिबी यामुळे त्रस्त झालेल्या व्हेनेजुएला सरकारने तब्बल दहा लाख रुपयांची चलनी नोट बाजारात आणली आहे. बोलीवर हे व्हेनेजुएलाचे चलन असून डॉलरमध्ये या दहा लाख बोलीवरच्या नोटीची किंमत फक्त अर्धा डॉलर म्हणजे 35 रुपये आहे भारतात एवढ्या किमतीत अर्धा लिटर पेट्रोलही मिळत नाही.
तेलाच्या जोरावर कधीकाळी संपन्न असलेला व्हेनेजुएला सध्या अत्यंत दरिद्री झाला आहे. त्या देशात चलनाला काहीच किंमत राहिली नाही. लोक पोतेभर पैसे घेऊन जात आहेत आणि पिशवीभर सामान आणताना दिसत आहेत व्हेनेजुएलाच्या केंद्रीय बॅंकेने दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी आठवड्यात दोन लाख आणि पाच लाख बोलीवरच्या नोटाही चलनात आणण्यात येणार आहेत.
सध्या व्हेनेजुएलामध्ये दहा हजार, आणि वीस हजार बोलीवरच्या नोटाही चलनात आहेत. गेली आठ वर्षे सतत व्हेनेजुएलाला आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत व्हेनेजुएलाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 20 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे.
केवळ व्हेनेजुएलाचा विचार केला तर सध्या 10 लाख बोलीवरच्या नोटमध्ये फक्त 2 किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळ मिळू शकतो.